सफाई कर्मचाऱ्यांचं 15 सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण

Edited by: विनायक गांवस
Published on: September 09, 2025 13:26 PM
views 132  views

सावंतवाडी : सावंतवाडी शहराची स्वच्छता राखण्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या सुमारे ६० कंत्राटी सफाई कामगारांना गौरी-गणपतीसारख्या मोठ्या सणासुदीच्या काळातही पगार न मिळाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. सुमारे तीन वर्षांचा पीएफ थकीत असताना, एक महिन्याचा पगार देण्याबाबत पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत आश्वासन दिले गेले होते. मात्र, तेही पाळले गेले नाही. या बेभरवशी आणि निष्काळजी कारभाराविरोधात, १५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून बेमुदत उपोषणाला बसण्याचा निर्णय कामगारांनी घेतला आहे.

सावंतवाडी शहरातील गुरुकुल येथे आज माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली कंत्राटी सफाई कामगारांची बैठक झाली. या बैठकीत माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, अभय पंडित, मनोज घाटकर, इफ्तिकार राजगुरू, बंड्या तोरसेकर, उमेश खटावकर, सुंदर गावडे, जॉनी फर्नांडिस, कामगार प्रतिनिधी बाबू बरागडे, सागर खोरागडे, विनोद काष्टे, बाबू कदम, कृष्णा डोईफोडे,लवू लाटये, सचिन कदम,सोहेब शेख, शब्बीर नाईक,राजू मयेकर, नितीन पोखरे,रवी कदम यांच्यासह अनेक कामगार उपस्थित होते. या बैठकीत कामगारांनी नगरपरिषदेच्या कारभारावर जोरदार टीका केली. प्रशासक तथा प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पगार आणि पीएफ देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, पंधरा दिवसांनंतरही 'तांत्रिक कारणे' पुढे करत अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही कार्यवाही केली नाही, असा आरोप कामगारांनी केला आहे. सणाच्या तोंडावर पगार न मिळाल्याने कामगारांच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

कायदेशीर लढ्यासाठी वकिलाची मोफत मदत

थकीत पीएफबाबतही नगरपरिषदेने कोणतीच कारवाई न केल्याने, कामगारांनी आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. या कायदेशीर लढ्यात कायदेतज्ज्ञ ॲड. अनिल निरवडेकर यांनी कामगारांसाठी मोफत मदत करण्याचे मान्य केले आहे. ते संपूर्ण न्यायालयीन कामकाज पाहणार असल्याने, कामगारांनी त्यांचे आभार मानले आहेत.उपोषणामध्ये प्रमुख नेतेही सहभागी होणार आहेत.१५ सप्टेंबर रोजी सुरू होणाऱ्या या बेमुदत उपोषणात माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासोबत माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, आफ्रोझ राजगुरू, मनोज घाटकर आणि गुरुकुलचे इतर कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा निर्धार कामगारांनी केला आहे.