भजनात भाव महत्त्वाचा : अँड. देवदत्त परूळेकर

वेंगुर्ल्यात जिल्हास्तरीय संगीत भजन स्पर्धेचे उद्घाटन
Edited by: विनायक गांवस
Published on: August 10, 2024 11:01 AM
views 66  views

वेंगुर्ले : भजन ही भक्ती आहे आणि भक्तीतून कला निर्माण होते. भावाशिवाय भजनाला किमत नाही. म्हणूनच भजनात भाव महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक अँड. देवदत्त परूळेकर यांनी वेंगुर्ला येथील भजन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केले.

      युवा उद्योजक विशाल परब पुरस्कृत भटवाडी मित्रमंडळ वेंगुर्ला तर्फे येथील ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिरात सिधुदुर्ग जिल्ह्यातील निमंत्रित मंडळाच्या संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून याचे उद्घाटन शुक्रवारी ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवा, संत साहित्याचे अभ्यासक देवदत्त परूळेकर, प्रसिद्ध गायीका अनघा गोगटे, रामेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष यशवंत परब, देवस्थान मानकरी सुनिल परब यांच्या हस्ते झाले. यावेळी देवस्थान ट्रस्टचे रविंद्र परब, संजय परब, स्पर्धेचे परिक्षक हेमंत तवटे व रूपेंद्र परब तसेच भटवाडी मित्रमंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 नाद, ताल, सूर, लय या सर्वांनी सहभागी झालेल्या भजन मंडळाकडून परमेश्वराची आराधना घडो अशाप्रकाराच्या शुभेच्छा अनघा गोगटे यांनी दिल्या. तर भजनाची परंपरा ही संतमंडळींकडून आली आहे. मानवाचा उद्धार होण्याची ताकद भजनामध्ये असल्याचे ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवा यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक राजा सामंत यांनी केले. तर आभार देवस्थान अध्यक्ष यशवंत परब यांनी मानले. दोन दिवस चालणा-या या भजन स्पर्धेमध्ये सिधुदुर्ग जिह्यातून १३ मंडळे सहभागी झाले आहेत.