साने गुरुजींचे विचार आत्मसात करावेत : सुहास ठाकूर देसाई

Edited by:
Published on: June 12, 2025 16:50 PM
views 97  views

दोडामार्ग :  येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयामध्ये साने गुरुजी यांचा 75 वा स्मृती दिन साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांच्या हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

ह्या प्रसंगी बोलताना सुहास ठाकूर देसाई म्हणाले की प्रेम, करुणा, ममत्व, शुचिता, संस्कार, त्याग, हे सर्व गुणविशेष व लेखन कथन आणि वक्तृत्व अशी जन्मजात कौशल्ये जिथे एकाच वेळी एकवटलेली होती अशी व्यक्ती म्हणजे साने गुरुजी. त्यांच्या आपल्यातून निघून जाण्याने महाराष्ट्रातून ही सर्व तत्वे मूल्ये यांनीच चिरनिद्रावस्थेत स्वतःला झोकून दिले असे सतत वाटत राहते. राष्ट्र सेवा दलाला स्वतःचा श्वास मानण्याएवढे मोठेपण त्यांनी दिले. ह्या श्वासामुळेच समाजपुरुषाचे चलन वलन व्यवस्थित राहील असा विश्वास त्यांना वाटत होता. सेवा दल सैनिक म्हणून त्यांच्या आदर्शांना, मूल्यांना आरसा मानून त्यात आपण सर्वांनी आपली कृती उक्ती व विचार पडताळून घ्यावेत. त्यांचा स्मृतिदिन हा आपला प्रत्येकाचा आत्मपरीक्षण दिन असावा.

ह्या प्रसंगी प्राचार्य डॉ. सावंत यांचेही साने गुरुजींना श्रद्धांजली वाहणारे भाषण झाले. सांस्कृतिक विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पी. डी.गाथाडे यांनी केले तर प्रा. डॉ.संजय खडपकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.यावेळी कॉलेजचे  विद्यार्थी प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते .