
सावंतवाडी : साने गुरुजींना 'श्यामची आई’पुरते मर्यादित ठेवून चालणार नाही. त्यांचे विचार महान होते. त्यांच्या विचारांची आज खऱ्या अर्थाने समाजाला गरज आहे. आजच्या काळात राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात मूल्य ढासळू लागली आहेत. मध्यमवर्गीय समाज आत्मकेंद्री बनत चालला आहे ही बाब चिंतनाची आहे. अशा परिस्थितीत साने गुरुजींचे विचार आत्मसात केल्यास समाज सध्याच्या अवस्थेतून बाहेर पडू शकतो असे मत सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केले.बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण आणि श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने साने गुरुजी यांच्या शतकोत्तर रौफ्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त जाहीर व्याख्यान श्रीराम वाचन मंदिरात आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
‘साने गुरुजींचे मूल्यविचार आणि आजची सामाजिक परिस्थिती’ असा या व्याख्याना विषय होता. यावेळी मालवण बॅ. नाथ पै सेवांगणो अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळेकर, श्रीराम वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष ऍड. संदीप निंबाळकर, शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर, साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर उपस्थित होते. हेरंब कुलकर्णी म्हणाले, साने गुरुजींची ओळख ‘श्यामची आई’ या पुस्तकापुरती अथवा चित्रपटापुरती नाही. साने गुरुजींनी आपल्या जीवनात संघर्ष केला. ते शिक्षकी पेशा स्वीकारून आपले जीवन आरामात जगू शकले असते. परंतु, त्यांना समाजाबद्दल आणि राष्ट्राबद्दल आत्मियता, प्रेम, कणव होती. त्यामुळे त्यांनी त्याला राम-राम ठोकून स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. त्यांच्या भाषणांनी समाज जागृत होऊ लागला. त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना पंधरा दिवस तुरुंगात टाकले. साने गुरुजी शिक्षक, स्वातंत्र्य सैनिक, अनुवादक, सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते. त्यांना केवळ ‘श्यामी आई’पुरते मर्यादित ठेवून चालणार नाही. त्यांचे विचार महान होते. त्यांच्या विचारांची आज खऱ्या अर्थाने समाजाला गरज आहे.मध्यमवर्गीय सर्व प्रश्नांपासून अलिफ्त आहे.
राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात आज मूल्य हरवत चालली आहेत. अशा काळात साने गुरुजींचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. आज राजकीय व्यवस्था पाहिली तर लोकांनी खोटी आश्वासने देणाऱ्या राजकीय नेत्यांना स्वीकारले आहे. त्यांना समाजाकडून जाब विचारला जात नाही. त्यामुळे 15 लाखाचे आश्वासन देऊन नंतर तो जुमला असल्याचे सांगण्याची हिंमत राजकीय नेत्यांना होते. ही परिस्थिती आपल्यामुळेच आली आहे. आज मध्यमवर्गीय सर्व प्रश्नांपासून अलिफ्त होत चालला आहे. गरीब वर्गातून मध्यमवर्गात आलेली लोकं चळवळीतून आली होती. त्यांना समाजाबद्दल, समाजाच्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांबाबत जागरूकता होती. परंतु, ते आता कुठे दिसत नाही अशी खंत श्री. कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले, साने गुरुजींनी आयुष्यात 115 पुस्तकांचे लेखन केले. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून दिले. गुरुजींचे विचार जोपासण्यासाठी आपण त्यांच्या साहित्याच्या वाचनाचा व्यासंग वाढविला पाहिजे. साने गुरुजींच्या जीवनातील अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यांचे जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्यसैनिक, शिक्षक, लेखक अशा अनेक अंगांनी गुरुजींचे जीवन समृद्ध झाले आहे. हे वर्ष गुरुजींचे शतकोत्तर रौफ्य महोत्सवी जयंती उत्सवाचे आहे. शिवाय गुरुजींना शिक्षक होऊन 100 वर्षे पूर्ण झाली आहेत असेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी केले. यावेळी प्रा. गोविंद काजरेकर, मंगलताई परुळेकर, डॉ. सुमेधा नाईक, विठ्ठल कदम यांच्यासह विचारवंत उपस्थित होते.