
सावंतवाडी : सासोलीत मोठी आर्थिक उलाढाल होत असून काळा पैसा या व्यवहारात आला आहे. त्यामुळे हे पैसे आले कुठून ? खरेदी-विक्री कशी झाली ? या सगळ्या आर्थिक व्यवहाराची ईडी चौकशी व्हावी व गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केली आहे. आज सासोली प्रकरणी श्री.पारकर यांनी सावंतवाडी भुमिअभिलेख कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.यावेळी सासोलीत कुणाची मस्ती चालू देणार नाही असाही इशारा दिला.
ते म्हणाले, जिल्ह्याच्या प्रश्नात आम्ही सगळे एकत्र आहोत. कोणाची मस्ती चालू देणार नाही. जे दोषी आहेत त्यांना सोडणार नाही असा इशारा उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी भुमिअभिलेखच्या अधिकाऱ्यांना दिला. स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असताना जमीन मोजणी झालीच कशी ? असा सवाल करत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. सामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दरानी परप्रांतीयांच्या घशात घालू देणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
यावेळी ते म्हणाले, 2016 पासून सासोलीचा व्यवहार सुरू झाला आहे. त्यावेळी कवडीमोल दिड लाख रूपये एकर दराने या जमीनी घेतल्या गेल्या. आता याच जमिनी १५ लाख गुंठ्याने विकल्या जात आहेत. यात काही एजंटांनी एकरी पैसे घेतले आहेत. त्याबदल्यात शेतकऱ्यांकडून दिड दोन लाखाने जमिनी घेऊन दिल्यात. याच जमिनी पुढे बारा-पंधरा लाखाने विकल्या गेल्यात. येथील कंपनी ही याचे एकरी दोन-चार कोटी करत आहे. फार मोठी आर्थिक उलाढाल तिथे होत आहे. काळा पैसा या व्यवहारात आला आहे. त्यामुळे हे पैसे आले कुठून? खरेदी-विक्री कशी झाली ? या सगळ्या आर्थिक व्यवहाराची ईडी चौकशी व्हावी व आर्थिक गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केली आहे.
दरम्यान, बाहेरच्यांनी लक्ष घालू नये असं सांगणाऱ्या दीपक केसरकरांनी मुंबईच पालकमंत्री सोडावं अन् सावंतवाडीत लक्ष घालावं. आपण स्थानिक मंत्री म्हणून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या, संदेश पारकरला तिथे लक्ष घालायची गरज नाही असं मत व्यक्त केले. तर बाबुराव धुरी हे आमचे सहकारी आहेत. उद्याच्या आंदोलनात महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते असतील असंही श्री. पारकर म्हणाले. यावेळी शिवसेनेचे बाळा गावडे, शब्बीर मणियार, शैलेश गवंडळकर, आबा सावंत आदी शिवसैनिक उपस्थित होते.