
सावंतवाडी : ऐतिहासिक सावंतवाडी शहराला नेहमी स्वच्छ ठेवण्याचे काम दिवस-रात्र करत असणाऱ्या स्वच्छतादूतांच्या उपस्थितीत माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांच्या हस्ते सफाई मित्रांना रेनकोट व हातमोजे वाटप करण्यात आले. संदिप गावडे मित्रमंडळाकडून हा उपक्रम राबविण्यात आला.
शहराची स्वच्छता राखण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या या दूतांचा या निमित्ताने सन्मान करण्यात आला. त्यांच्या समर्पण आणि कार्यासाठीचा गौरव यानिमित्ताने करण्यात आला. या उपक्रमातून स्वच्छता दूतांना त्यांच्या कार्यात मदत होईल आणि ते अधिक सुरक्षिततेने काम करू शकतील. सावंतवाडी शहर अधिक स्वच्छ आणि सुंदर होण्यास हातभार लागेल. त्यांच्या अथक प्रयत्नांसाठी आम्ही सदैव आभारी आहोत अशी भावना संदिप गावडे यांनी व्यक्त केली.