
सावंतवाडी : तळवडे मतदारसंघात सकाळपासूनच तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता महायुतीचे उमेदवार संदीप गावडे यांचा विजय निश्चित आहे असा दावा भाजप युवा नेते विशाल परब यांनी केला. तालुक्यातील बुथवर पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटी त्यांनी यावेळी घेतल्या.
विरोधकांकडे व्हिजन नसल्याने महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही. भाजपच्या माध्यमातून झालेली विकासकामे पाहता जनता शंभर टक्के आमच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास श्री. परब यांनी व्यक्त केला. आज होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी सकाळी तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात बुथवर भेटी देऊन त्यांनी आढावा घेतला. यामुळे ठिकठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी विशाल परब यांच्यासोबत भाजपाचे जि. प. उमेदवार संदीप गावडे, माजी सभापती पंकज पेडणेकर, रविंद्र परब, बाळा जाधव आदी उपस्थित होते.










