स्व.प्रा. उदय खानोलकर यांच्या आठवणींना उजाळा

Edited by: विनायक गांवस
Published on: December 17, 2025 14:38 PM
views 31  views

सावंतवाडी : मळगाव येथील कै.प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरात "कोकणातील दशावतार" या ग्रंथाचे लेखक कै. प्रा.उदय खानोलकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून नवोदित दशावतार कलाकारांना ज्येष्ठ दशावतार कलाकारांकडून मौलिक असे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष महेश खानोलकर यांच्या हस्ते मान्यवरांचे गुलाब पुष्प व स्वागतकार्ड देऊन स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत स्व.प्रा. उदय खानोलकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.एम.के. उर्फ आबा गावकर उपस्थित होते, त्यांनी स्व.प्रा. उदय खानोलकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.

      यावेळी महाभारतातील उत्तरा अभिमन्यू व वृंदा जालंदर हे नाट्य प्रवेश मळगावचे सुपुत्र सुप्रसिद्ध दशावतारी कलावंत नारायण आसयेकर, ज्येष्ठ रंगकर्मी आरोसचे सुपुत्र संतोष रेडकर व महेश धुरी यांनी सादर केले. यावेळी नारायण आसयेकर यांनी अभिमन्यू व विष्णू या भूमिका सादर केल्या. संतोष रेडकर यांनी जालंधर तर महेश धुरी यांनी उत्तरा व वृंदा या स्त्री भूमिका सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांना प्रभाकर दळवी यांनी हार्मोनियम, निलेश मांजरेकर यांनी तबला तर समीर मांजरेकर यांनी झांज साथ दिली. 

सदर कार्यक्रमाला ग्रंथालयाचे उपाध्यक्ष बाबली नार्वेकर, संचालक हेमंत खानोलकर, शांताराम गवंडे बाळकृष्ण मुळीक महेश पंत, देवण सर, रामकृष्ण परब, गुरुनाथ गावकर ग्रंथपाल आनंद देवळी, कर्मचारी वर्ग व पंचक्रोशीतील दशावतार प्रेमी वाचन प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक व आभार प्रदर्शन ग्रंथालयाच्या कार्यवाह सौ.स्नेहा खानोलकर यांनी केले.