धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास वक्तृत्व स्पर्धेतून जागवणार

कोमसाप तर्फे दरवर्षी स्पर्धा
Edited by: विनायक गांवस
Published on: May 15, 2023 20:46 PM
views 328  views

सावंतवाडी : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आणि त्यांचे कार्य पुढील पिढीसमोर अजरामर राहावे यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे दरवर्षी वक्तृत्व स्पर्धा भरवण्यात येईल, या माध्यमातून इतिहास जागवला जाईल असे मत कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष अँड. संतोष सावंत यांनी स्पष्ट केले. कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा तर्फे आज रविवारी 14 मे रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.


 यावेळी त्यांच्या फोटोला पुष्पहार देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेजचे प्राचार्य यशोधन गवस यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. यावेळी गझलकार व काव्य प्रशिक्षक विजय जोशी, कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सचिव प्रतिभा चव्हाण, सहसचिव राजू तावडे, नकुल पार्सेकर, कवी दीपक पटेकर, मेघना राऊळ, रामदास पारकर आदी उपस्थित होते.

यावेळी सावंत पुढे म्हणाले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श आणि त्यांचे कार्य महान आहे आणि हा इतिहास आजच्या तरुणाला उमजावा यासाठी आणि यातून एक साहित्य चळवळ उभी राहावी यासाठी पुढील वर्षी जयंतीला वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नकुल पारसेकर यांनी अटल प्रतिष्ठानच्या माध्यमातून या वक्तृत्व स्पर्धेला सहकार्य केले जाईल असे स्पष्ट केले. यावेळी सूत्रसंचालन मेघना राऊळ यांनी केले तर आभार दीपक पटेकर यांनी मानले.