
सावंतवाडी : कुडाळ तालुक्यातील घोडगे-सोनवडे गावातील एका चाकरमन्याला सावंतवाडी येथे अचानक चक्कर येऊन तो बेशुद्ध पडला. अशा स्थितीत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी तात्काळ मदत करत त्याला सुखरूप त्याच्या गावी पोहोचवले. या मानवतावादी कार्यामुळे प्रतिष्ठानचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुंबईहून गणपतीसाठी गावी आलेला आणि परत मुंबईला जायच्या तयारीत असलेला २५ वर्षीय सुशांत घाडीगावकर सावंतवाडीच्या बाजारपेठेत खरेदी करत असताना सकाळी ११ च्या सुमारास अचानक बेशुद्ध पडला. ही घटना सामाजिक कार्यकर्त्या माया सरचिटणीस यांच्या निदर्शनास आली. त्यांनी लगेच सामाजिक बांधिलकीचे सदस्य रवी जाधव यांना याची माहिती दिली.
माहिती मिळताच रवी जाधव आणि लक्ष्मण कदम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वाहतूक शाखेचे पोलीस प्रशांत आरोलकर यांच्याशी संपर्क साधला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन माजी जिल्हा परिषद सदस्य लॉरेन्स मान्यकर यांच्याशी संपर्क साधून सुशांत घाडीगावकरच्या घराचा पत्ता मिळवला.
प्राथमिक उपचारानंतर, पोलीस प्रशांत आरोलकर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य लॉरेन्स मान्यकर यांच्या मदतीने रवी जाधव आणि लक्ष्मण कदम यांनी सुशांतला त्याच्या कुडाळ तालुक्यातील घोडगे-सोनवडे या मूळ गावी सुखरूप पोहोचवले. सावंतवाडीपासून सुमारे ७० किलोमीटर दूर असलेल्या या गावी त्याला पोहोचवण्याचे काम त्यांनी सामाजिक बांधिलकीतून केले.
या कार्याबद्दल पोलीस कर्मचारी प्रशांत आरोलकर, माजी सरपंच लॉरेन्स मान्यकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रवी जाधव आणि लक्ष्मण कदम यांचे आभार मानले असून, त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. या घटनेमुळे समाजातील संवेदनशीलतेचे आणि मदतीच्या भावनेचे उत्तम उदाहरण समोर आले आहे.