देवस्थान जमिनीची विक्री | कोल्हापुरात माडखोल ग्रामस्थांचं उपोषण

Edited by: विनायक गावस
Published on: August 15, 2022 12:24 PM
views 169  views

सावंतवाडी : माडखोल येथील श्री देवी पावणाई देवस्थान जमीन सर्व्हे नं. १२३, हिस्सा नं. ०१ अशी असलेली जमीन विक्री करण्यात आली आहे. तसेच इतरही सर्व्हे नंबरच्या जमिनी विक्रीस गेल्याचे समजते. यासंदर्भात गेले सहा महिने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती उपकार्यालय, सावंतवाडी तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, कोल्हापूर यांच्याकडे वारंवार अर्ज करूनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

याबाबत नाईलाजास्तव कोल्हापूर येथे सोमवारी (१५ ऑगस्ट) उपोषणास बसणार असल्याचे पत्रक राजकुमार राऊळ, विशाल राऊळ व ग्रामस्थांनी प्रसिद्धीस दिले आहे. माडखोल येथील श्री देवी पावणाई देवस्थान जमीन सर्व्हे नं. १२३, हिस्सा नं. ०१ अशी असलेली जमीन विक्री केली आहे. याबाबत राजकुमार राऊळ व माडखोल ग्रामस्थ गेले सहा महिने सावंतवाडी व कोल्हापूर देवस्थान समितीशी याबाबत पत्रव्यवहार करीत आहेत. परंतु या ग्रामस्थांची अद्याप कोणीही दखल घेतली नाही किंवा कोणतीच कार्यवाही केली जात नाही. देवस्थानची जमीन विक्री केलेल्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी प्रमुख मागणी राजकुमार राऊळ व माडखोल ग्रामस्थांची आहे. यासाठीच राजकुमार राऊळ हे कोल्हापूर येथील देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, शिवाजी पेठ कोल्हापूर या कार्यालयासमोर १५ ऑगस्ट रोजी उपोषणास बसणार आहेत, असे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

माडखोल देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती तात्काळ बरखास्त करणे, पावणाई देवस्थान जमीन विक्री करणाऱ्यावर तात्काळ गुन्हे दाखल करणे, ही जमीन खरेदी-विक्री करतेवेळी असलेले गावातील साक्षीदार यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करणे, नवीन स्थानिक देवस्थान सल्लागार उपसमिती, माडखोल स्थापन करणे, जुन्या स्थानिक सल्लागार उपसमितीतील सदस्यांची नवीन सल्लागार समितीवर नेमणूक करू नये आदी मागण्या राऊळ व ग्रामस्थांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केल्या आहेत.