LIVE UPDATES

संत रोहिदास यांनी जातिभेद - धर्मभेद मिटवण्यासाठी सनातनी समाजाविरोधात बंड केलं : परशुराम चव्हाण

Edited by:
Published on: February 13, 2025 20:07 PM
views 97  views

सावंतवाडी : संत शिरोमणी रोहिदास यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जपत जातिभेद व धर्मभेद मिटवण्यासाठी सनातनी समाजाविरोधात बंड केले. सतीच्या चालीचे अवडंबर माजू दिले नाही. अशा या संत रोहिदास यांनी जागतिक संत संमेलन घेतले त्यावेळी ब्राह्मणांनी श्रीक्षेत्र काशीमध्ये पालखीतून त्यांची मिरवणूक काढली होती. संत शिरोमणी रोहिदासां सारख्या संतांचे विचार आचरणात आणण्याची गरज आहे‌. या थोर संतांची शिकवण समाजाने अंगीकारून अनिष्ट रूढी परंपरांना तिलांजली द्यावी असे आवाहन संत शिरोमणी रोहिदास यांचे गाढे अभ्यासक ज्येष्ठ निवृत्त शिक्षक परशुराम चव्हाण यांनी केले.संत रोहिदास यांच्या 648 व्या जयंती उत्सवानिमित्त सावंतवाडी येथे बोलत होते.

सावंतवाडी येथील समाज मंदिरमध्ये संत रोहिदास यांच्या जयंती उत्सव झाला. सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा सावंतवाडी तालुका समाज मंडळाच्या वतीने आयोजित या जयंती उत्सवानिमित्त सुरुवातीला समाज मंडळाचे तालुकाध्यक्ष गणेश म्हापणकर यांच्या हस्ते संत रोहिदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर दीप प्रज्वलन झाले यावेळी प्रास्ताविकात मंडळाचे सचिव गुंडू चव्हाण यांनी संत रविदास यांच्या जीवनावर माहिती दिली. यावेळी समाज मंडळाचे अध्यक्ष गणेश म्हापणकर , सचिव .गुंडू चव्हाण ,जिल्हा कार्यकारी सह सेक्रेटरी बाबुराव चव्हाण , मार्गदर्शक विजय चव्हाण , लक्ष्मण आरोसकर ,  नरेश कारिवडेकर, दिलीप इन्सुलकर, डॉ. शरद जाधव, शेखर दाभोलकर, विजय ओटवणेकर, राजकुमार चव्हाण, राजेश फोंडेकर,  प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते. घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या "अनटचेबल" ग्रंथामध्ये संत रोहिदास यांचा खास उल्लेख करण्यात आलेला आहे संत रोहिदास यांनी जागतिक संत संमेलन घेण्याचा मान मिळवला आहे. तर सिकंदर लोधी या महाराजाचा राजगुरू असलेल्या संत रोहिदास यांना त्यांनी दिल्ली तुकलताबाद येथील बारा एकर जमीन गुरुदक्षिणा म्हणून बहाल केली होती. तर मक्का या मुस्लिम धर्मियांच्या पवित्र स्थानाच्या ठिकाणी सिकंदर लोधी यांनी संत रोहिदास यांना नेले त्यांच्यासोबत संत कबीर ही होते असेही श्री.चव्हाण म्हणाले. तर आभार प्रदर्शन सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विजय चव्हाण यांनी केले.