
सावर्डे : शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते दहिवलीतीमधील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांकडून " सह्याद्रि डेअरी " हा नाविन्यपूर्ण दुग्ध प्रक्रीया प्रकल्प राबविण्यात आला आहे. कृषि क्षेत्रामधील दुग्ध प्रक्रिया हा एक महत्त्वपूर्ण पुरक व्यवसाय होय. या क्षेत्रामध्ये एक सक्षम उद्योजक घडविण्याची क्षमता आहे.तसेच या मधुन जास्तीत जास्त रोजगार निर्माण होवु शकतात हे चित्र समोर ठेवुन अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत या विद्यार्थ्यांकडून दोन महिन्यापुर्वी या प्रकल्पास सुरुवात करण्यात आले.
खरवते व दहिवलीमधील स्थानिक पशुपालकांकडुन दुध खरेदी करून त्यावर प्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट या विद्यार्थ्यांनी उराशी बाळगले. सुमारे चौदा विद्यार्थ्यांचा सहभाग असणाऱ्या या प्रकल्पामध्ये मुलींचा सहभाग उल्लेखनीय आहे. सुरवातीच्या काळामध्ये या विद्यार्थ्यांकडून प्रकल्प सुरु करण्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपये असे एकूण चौदा हजार रुपये जमवण्यात आले.महाविद्यालयाचा माध्यमातून या सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व साधन सामुग्री व दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनासाठी प्रयोगशाळा देण्यात आली. ग्राहकांना कोणते पदार्थ अपेक्षित आहेत याचा अभ्यास करून या विद्यार्थ्यांनी उपलब्ध संसाधनांचा पुरेपुर वापर करत उत्कृष्ट असे दुग्धजन्य पदार्थ बनविण्यास सुरुवात केली.
यामध्ये कोल्ड काॅफी, बदामशेक, मलई पेढा, कंधी पेढा, लस्सी, गुलाबजाम रबडी , मठ्ठा, गुलाबजाम, चिक्कू शेक, बासुंदी, मँगो व पिस्ता श्रीखंड, पनीर व पनीर मधुन शिल्लक राहणाऱ्या घटकांपासुन मँगो व पिस्ता हे ड्रींक हे विद्यार्थ्यी बनवत आहेत. उत्कृष्ट चव व नवनवीन पदार्थांमुळे या विद्यार्थ्यांच्या पदार्थांना सावर्डे, खरवते व दहिवली भागात प्रचंड मागणी आहे. तसेच हे विद्यार्थ्यी स्थानिक पशुपालकांशी संबंध जोडुन एक सक्षम पुरवठा साखळी तयार करण्यात यशस्वी झाले आहेत. परिपूर्ण अभ्यास, उत्तम व्यवस्थापन, ग्राहकांशी असलेला संपर्क या सर्व गोष्टींमुळे या विद्यार्थ्यांच्या पदार्थांना मागणी वाढत आहे. व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवुन हे सर्व विद्यार्थ्यी " सह्याद्रि डेअरी" या नावाखाली उत्कृष्ट रित्या काम करत आहेत.
आजतागायत या विद्यार्थ्यांकडून सुमारे दोनशे हुन अधिक लीटर दूधावर प्रक्रीया करण्यात आली आहे व अनुभवात्मक शिक्षण हा उद्देश यशस्वी रित्या पुर्ण करण्यात आला आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या कामाबद्दल सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांनी कौतुक केले .सर्वांना प्रोत्साहित केले व भविष्यामध्ये जे विद्यार्थ्यी हा उपक्रम व्यावसायिकदृष्ट्या अवलंबणार असतील त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले .या सर्व विद्यार्थ्यांना हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे पशुसंवर्धन व दुग्ध प्रक्रीया विभागाचे प्राध्यापक बाळासाहेब मुंडे व अन्नतंत्रज्ञान विभागाचे प्राध्यापक रविंद्र सरगर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.