कोकणच्या लाल मातीतील 'साहित्यरत्न' : कविवर्य डॉ. वसंत सावंत

Edited by: विनायक गांवस
Published on: April 11, 2024 09:55 AM
views 193  views

कोकणचं पहिलं दैनिक 'दै. कोकणसाद' च्या माध्यमातून 'जागर कोकणच्या साहित्यरत्नांचा' ही विशेष मालिका सुरु करण्यात आली असून याअंतर्गत  साहित्यक्षेत्रात योगदान देणारे साहित्यिक व साहित्यप्रेमी यांच्या मुलाखती या सदरात घेण्यात येत आहेत. या विशेष मालिकेच्या माध्यमातून ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर, अजय कांडर, वीरधवल परब, डॉ. गोविंद काजरेकर, दादा मडकईकर, डॉ. जी.ए.बुवा आदींसह कोकणच्या लाल मातीतील बहुतांश साहित्यरत्नांपर्यंत आम्ही पोहचलो असता प्रत्येकाच्या तोंडून ऐकावयास मिळालेलं नाव म्हणजे कै. कवीवर्य डॉ. वसंत सावंत सर. कोकणच्या लाल मातीच्या सौंदर्यावर कविता करणारे कविवर्य डॉ. वसंत सावंत यांचा जन्म ११ एप्रिल १९३५ रोजी सांगूळवाडी येथील शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण फोंडा येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते मुंबई गेले असता प्रा. रमेश तेंडुलकर, प्रा. अनंत काणेकर, प्रा.डॉ. स. ग. मालशे यांसारखे काव्यप्रतिभा फुलवणारे प्राध्यापक गुरू म्हणून त्यांना लाभले.



रेल्वेमध्ये कारकुनी करत असतानाच त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सुरू ठेवलं होते. मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवी म्हणून त्यांची तेव्हाच्या रत्‍नागिरी व आताच्या सिंधूदूर्ग जिल्ह्यात ओळख होती.  'प्रवासवर्णन एक वाङ्मयप्रकार’ या विषयात त्यांनी पीएचडी पदवी प्राप्त केली. १९६३ पासून सावंतवाडी येथील पंचम खेमराज महाविद्यालयात निवृत्तीपर्यंत मराठी विषयाचे अध्यापक म्हणून ते कार्यरत राहिले. सावंतवाडी संस्थानचे हिज हायनेस राजेसाहेब शिवरामराजे भोसले यांनी स्वतः वसंत सावंत सरांना या ठिकाणी बोलावून घेतलं होते. तेव्हापासून प्राध्यापक म्हणून या महाविद्यालयात ते कार्यरत होते. राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजशी देखील त्यांच नात होत. मोती तलावाचा काठ, आरपीडीच्या डोलकाठीवर बसून सरांनी अनेक कविता लिहिल्या. वाचन, लेखनासह व्यक्त होण्यासाठी त्यांनी अनेकांना प्रेरीत केलं. त्यांनी सुरु केलेल्या 'कोजागिरी कवी संमेलातून' कोकणातील अनेक नामवंत साहित्यिक उदयास आले. 'स्वस्तिक' हा त्यांचा पहिला कवितासंग्रह नंतर 'उगवाई', 'देवराई', 'माझ्या दारातले सोनचाफ्याचे झाड', 'सागरेश्वर'  काव्यसंग्रह प्रकाशित झाले. 'वसा' हे त्‍यांचे खंडकाव्य प्रसिद्ध आहे. 

प्रवासवर्णन एक वाङ्मयप्रकार हा त्‍यांचा समीक्षाग्रंथ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केला. प्रवासवर्णन या साहित्यप्रकाराची चर्चा करणारा मराठीतील हा पहिलाच ग्रंथ आहे.  त्यांच्या कवितांमध्ये निसर्ग भरभरून वाहिलेला आहे. बैल, सुतारपक्षी, रंग या त्यांच्या कवितांना अभ्यासक्रमात स्थान मिळाले. 'बैल' कविता बारावीच्या पाठ्यपुस्तकात आहे. त्यांना महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचा कविवर्य केशवसुत पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा ह.स. गोखले पुरस्कार, श्री संत नामदेव पुरस्कार, यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार, कोकण मराठी साहित्य परिषदेचा कोकणभूषण पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सावंतवाडीतील कवी केशवसुत स्मारकाजवळ जाणाऱ्या मार्गाला कवीवर्य डॉ. वसंत सावंत मार्ग असं नाव देण्यात आलं आहे. या केशवसुत कट्ट्यावर असणारी केशवसुतांची 'उदासी' भासणारी डॉ. वसंत सावंत यांची कविता त्याचप्रमाणे बैल, सुंदरवाडी उर्फ सावंतवाडी, जेव्हा झाड गात बसते ! या कवीता त्यांच्या सुंदरवाडीतील वास्तव्याची जाणीव करून देतात. अशा या लाल मातीतील 'साहित्यरत्ना'स जयंती निमित्त टीम कोकणसादकडून विनम्र अभिवादन....!