लिहीण्यासाठी विचारांची बैठक पक्की असावी : बालसाहित्यिका कल्पना मलये

'जागर' कोकणच्या साहित्य रत्नांचा..!
Edited by:
Published on: May 04, 2024 13:48 PM
views 73  views

कल्पना मलये

बालसाहित्यिक

पुष्प -२८ वं

कोकणचं पहिलं दैनिक कोकणसाद व कोकणचं नं. 1 महाचॅनल कोकणसाद LIVE च्या 'जागर' 'कोकणच्या साहित्य रत्नांचा', या विशेष कार्यक्रमात आपण एका अष्टपैलू अशा बाल साहित्यिकेला भेटणार आहोत. मालवणी भाषेतील 'कारटो' या बाल कादंबरी बरोबरच ज्यांनी अक्षरदोस्ती हा खास बालकविता संग्रह लिहिला अशा बालमनाशी घट्ट नातं निर्माण केलेल्या कवयित्री कल्पना मलये. जागर कोकणच्या साहित्यरत्नांचा या २८ व्या पुष्पात कवयित्री कल्पना मलये यांची खास मुलाखत घेतलीय आमचे दैनिक कोकणसादचे संपादक संदीप देसाई यांनी. 

मुलाखत

पुष्प : २८ वं.

तुमच्या लेखनाची सुरूवात कशी झाली ?

लेखन आणि जगणं वेगळं नसतं. जगण्यातला भवताल, आजूबाजूची माणसं मी वेचत होते. शिक्षक म्हणून देखील कार्यरत होते‌. वाचन करत होते. हे करत असताना मी लिहीत होते. सगळंच साहित्य मी प्रकाशित केलेलं नाही, समाधानासाठी लिहीत होते. हळूहळू कविता लिहीत गेले. नियतकालिकांसाठी लिहू लागले अन् साहित्याशी जोडले गेले. विचारांची धारा पक्की होती. अनेक मार्गदर्शन करणारी माणसं मिळत गेली. यातूनच साहित्याची सुरुवात झाली.

शिक्षिका असल्यामुळे बालसाहित्याची अधिक ओढ होती का ?

माझं केंद्र हे मानवतावादी आहे. त्याच दृष्टीकोनातून मी लिहीत गेले. लहान मुलं ही माझी आवड होती. जिल्हा परिषदला प्राथमिक शिक्षिका असल्यानं पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग शिकवत असताना वाचन ही मुलांची मोठी समस्या असल्याचं लक्षात आलं. मुलांनी वाचलं पाहिजे यासाठी आपण लिहीलं पाहिजे हे मला सातत्याने जाणवायला लागलं. 'कारटो' सारखी बालकादंबरी जगण्याच्या मिश्किलपणातून लेखनात आली.

आपल्या 'कारटो' या मालवणीतील कादंबरीविषयी काय सांगाल ?

माझ्या वर्गात खोडकर मुल आहेत. त्यांना मी ओरडते. पण, त्यांचा मला राग येत नाही. फक्त, एक भिती असते की त्यांनी खोड्याकरून कुणाला इजा होऊ नये, त्यांच्या अथवा दुसऱ्यांच्या जीवावर बेतू नये. पण, अशी मुलं मला अधिक आवडतात. ही मुलं उत्साहाचा झरा असतात. समस्येत जगण्याचा एक दृष्टीकोन ही मुलं देतात. असे अनेक विद्यार्थी, माझी भावंड ही अशीच होती. यातूनच 'कारटो'ची निर्मीती झाली. छोटी कथा मी सुरूवातीला लिहीली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. हा बालनायक सोडू नकोस असं सुचवलं गेलं. त्यातूनच कादंबरी लिहून पूर्ण झाली.

आपल्या 'अक्षर दोस्ती' या बाल कवितासंग्रहाविषयी जाणून घ्यायला आवडेल

'अक्षर दोस्ती' ही मुळाक्षरांची कविता आहे. हे माझं पहिलं अपत्य आहे. शैक्षणिक साहित्य म्हणून मी त्याकडे पहाते‌. मुलांना अक्षरनिर्मीती करता यावी यातून 'अक्षर दोस्ती' या बाल कवितासंग्रहाचं प्रकाशन झालं.

आजकाल बालसाहित्य कमी प्रमाणात लिहिलं जात अस वाटत का ?

समाजमनाची अशी धारणा आहे की बालसाहित्य कुणीही लिहू शकत. बालिश गोष्ट म्हणून पाहिल जात. परंतू, चार दोन ओळी लिहिण्याएवढं ते सोप्पं नाही. बालसाहित्य लिहिणं सर्वात अवघड गोष्ट आहे. सहज मला सुचल्त गेलं. लहान मुलांच्या सहवासात अधिक असल्यानं माझ्याकडून बालसाहित्य लिहीलं गेल. त्यांच्या जगण्यातील आनंद ही माझी प्रेरणा होती. मोबाईल, टीव्हीच्या जगात वाचनाकडे मुलांना वळविण्यासाठी मी लिहील. आजच्या पिढीला वाचन संस्कृतीकडे वळवण आवश्यक आहे. शंभर टक्के मुलं वाचणारी आहेत. वाचन चळवळी राबवण गरजेत आहे‌.‌ कारटोच्या चार हजार प्रती खपल्या, महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाला. हे बघता आपण मुलांसाठी, मुलांसोबत वाचलं पाहिजे. 

बालसाहित्यिक असणं कमी पणाच मानल जात का ?

हा समज चुकीचा आहे‌. प्रा. प्रवीण बांदेकर यांच्यासारख्या साहित्यिकाला देखील बालसाहित्याकडे वळावं असं वाटतं. त्यामुळे मुलांनी वाचलं पाहिजे असं लिहाव. बालसाहित्याला हलक्यात घेऊ नये. मुलांना उपदेश देण्यापेक्षा प्रश्नकर्त्या मुलांना उत्तर सापडेल असं लिखाण करावे. आमची पिढी वेगळी होती, आजची वेगळी आहे. मुलांना जगणं समजलं पाहिजे, त्यांच्या जगण्यातील आनंद त्यांना कळावा या हेतूने मी लिहीत आहे. 

सद्या कोणत्या प्रकारचे लेखन करत आहात ?

माझ कविता लेखन, ललित लेखन सुरू आहे. कवितासंग्रह यावा अशी मागणी होत आहे. पण, पुन्हा पुन्हा बालसाहित्यातील नायक मला ते लिहीण्यास भाग पाडत आहेत. 'सई' या गोड मुलीवर आधारित पुस्तक १४ मेला येत आहे. ही एक अंगणवाडीतील नायिका आहे‌. तिच्या भावविश्वावर आधारित लेखन यात आहे. त्यामुळे लहान मुलांसह मोठ्यांनी देखील बाल साहित्य वाचाव. आजही टीव्हीवरची कार्टून पहाण्याचा आनंद मी घेते‌. कारटोला जसा प्रतिसाद दिला तसाच सईला देखील द्यावा. तसेच कवितासंग्रह प्रकाशित करावा यासाठीही माझा भर आहे. 

आपले आवडते लेखक, कवी यांच्याविषयी काय सांगाल ?

मंगेश पाडगांवकर यांच्या बालसाहित्यातील कवीता अधिक आवडतात. पु.ल.देशपांडे यांच लेखन अधिक भावतं. अनेक लेखक, कवींच्या साहित्यांच वाचन केलं आहे. नेमकं एकाचच नाव सांगता येणार नाही. पण, सगळ्यांच्या लिखाणाचा प्रभाव राहिला आहे. 

नव साहित्यिकांना काय सांगाल ?

प्रसिद्धीचा सोर्स आता मोठा आहे. परंतु, तात्कालिक प्रसिद्धीच्या मागे लागू नये‌. लेखनाला प्रतिसाद मिळाला म्हणून खुष अन् नाही मिळाला म्हणून नाराज व्हायच नाही. मनाच्या समाधानासाठी लिहीत रहावं. लिहिण्यासाठी विचारांची बैठक पक्की असावी लागते. तसेच मानव‌ हा केंद्र असावा तर संवेदनशीलतेनं प्रश्न जाणवतील. माझी सेवा रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाल्यानं खेड्यापाड्यातील समस्या मला समजल्या. या समस्या सोडवता येतीलच असे नाही.‌ परंतू, त्या दृष्टीने प्रयत्न होतो. समाजमाध्यमांच्या चकचकीत पणाला भावू नये. पुरस्कार हे धेय्य मानू नये. वाचक व स्वतःच्या आनंदासाठी लिहीत रहावं. वाचन चळवळीसाठी आपण देखील वाचल पाहिजे.‌ आपण वाचल तर मुलंही वाचतील. पुस्तक प्रकाशित करण्याच प्रमाण वाढलं पाहिजे. वाचनासारखा दूसरा गुरू नाही. पुस्तकाला जगण्याचा केंद्रबिंदू मानून वाचन करा.