
वेंगुर्ले : आजगाव वेशी वरून गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया, श्री माऊली देवी चा विजय असो अशा नामजपात ढोल ताशांच्या गजरात व वारकरी यांच्या भजनाने शेकडो भाविकांच्या उपस्थितीत भव्य मिरवणुकीने शिरोडा माऊली मंदिर येथे गणपतीचे आगमन झाले. अवघा शिरोडा गाव भक्तीमय बनला आहे. आजपासून सुरू होणाऱ्या शिरोडा माउली मंदिरातील सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळ्याच्या आनंदाची ही नांदीच असल्या प्रमाणे वातावरण निर्माण झाले आहे.
तब्बल १६ वर्षानंतर शिरोडा गावात श्रीदेवी माऊली पंचायतन देवस्थान आज ४ ते १२ मार्च या कालावधीत भव्य दिव्य अशा स्वरूपात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजलेला "सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळा' साजरा होत आहे. सोहळ्याच्या पूर्वसंध्येला ३ मार्च रोजी सायंकाळी भव्य मिरवणुकीने गणपती मूर्तीचे आगमन झाले. आजगाव वेशी येथे गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल पथक, वारकरी भजन, नामस्मरण असे करत गणपतीची मिरवणूक मंदिरापर्यंत आली.
यावेळी सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळ्याचे अध्यक्ष व विश्वस्त राजन शिरोडकर, कार्याध्यक्ष मयुरेश शिरोडकर, सचिव नारायण (नंदू) परब, खजिनदार नंदकुमार परब, विश्वस्त अशोक परब, विजय गावडे, संदीप परब, सदानंद हाडकी, अनंत नाबर, उपाध्यक्ष सचिन गावडे, जनार्दन पडवळ, उल्हास गावडे तसेच अमोल परब, चंदन हाडकी, प्रमोद नाईक, राकेश परब, चंदन हाडकी, राजन कांबळी, दत्तगुरु परब, ज्ञानेश्वर पडवळ, आदेश परब, बाबल गावडे, राहुल गावडे, दादा शेट्ये, पांडुरंग नाईक, महेश राऊत, शंकर गावडे, सुरेश परब, अशोक नाईक, प्रवीण धानजी यांच्यासह मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. या मिरवणूक मध्ये महिलांची संख्या लक्षवेधी होती.
सायंकाळी चार वाजल्यापासून आजगाव वेशी येथे ग्रामस्थ गोळा होण्यास सुरुवात झाली. या ठिकाणी शिरोड्या मधील प्रसिद्ध खाजेवाले श्रीराम नाईक यांनी मोफत सरबत व्यवस्था केली होती. मिरवणुकी दरम्यान रस्त्यावरील रांगोळी, वरच्या दिशेने फडकणारे पताका, बाजारपेठेत विद्युत रोषणाई, नागरिकांनी दरवाजा बाहेर लावलेल्या आकाश कंदीला बरोबरच घरासमोर व दुकानांसमोर लावलेले दीप सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
सोहळ्याला आजपासून सुरुवात
५० ते ६० पुरोहितांच्या उपस्थितीत साजरा होणारा हा सोहळा संपूर्ण गाव दिवाळी सारखा साजरा करणार आहे. गावातील प्रत्येक वाडीवर बैठका घेऊन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक दिवशी सकाळच्या सत्रात धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तर सायंकाळच्या सत्रामध्ये भजन, कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रम राहणार आहेत. सोहळ्यामध्ये श्री स्वामी जगद्गुरु शंकराचार्य यांची उपस्थिती व दर्शन सोहळा असणार आहे. आजपासून या सोहळ्याला सुरुवात झाली असून सर्वांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन देवस्थान व सहस्त्रचंडी अनुष्ठान समितीतर्फे करण्यात आले आहे.