
सावंतवाडी : 'आम्ही भारताचे लोक' या शब्दाने भारतीय संविधानाची सुरुवात होते. यातून ' भारतीय' म्हणून आपली ओळख करून देऊन सर्व देशवासियांचा गौरव व सन्मान ग्रंथ म्हणजे आपले संविधान होय, असे प्रतिपादन समतादूत सगुण जाधव यांनी रविवारी मळेवाड शाळा नंबर 1 सभागृह येथे केले. समता प्रेरणाभूमी संवर्धन समिती सावंतवाडी, या समितीच्या वतीने येथील मळेवाड शाळा नंबर 1 सभागृहात 'संविधान व शिक्षण अधिकार प्रबोधन मेळावा 2024' या कार्यक्रमात संविधान का समजून घ्यावे ? या विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष दीपक पडेलकर होते तर प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक कदम हे कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित होते.यावेळी पोलीस पाटील दिगंबर मसुरकर,ग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधव, समता प्रेरणाभूमीच्या उपाध्यक्षा भावना कदम, कार्याध्यक्ष अंकुश कदम,कांता जाधव, सचिव मोहन जाधव व अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. विवेक कदम, विशेष अतिथी व मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उद्घाटनपर भाषणात डॉ. विवेक कदम यांनी चळवळीचे कार्य करण्यासाठी समर्पणाची व त्यागाची गरज असते.बुद्धीची आणि वाणीची शक्ती ज्या समाजाला साध्य होते तो समाज शास्ता समाज होतो, यासाठी जागृतीचा अग्नि अखंड तेवत ठेवा असे प्रतिपादन करून प्रबोधनाच्या कामासाठी तरुणांचे सोशल नेटवर्किंग सेंटर तयार करण्याची सूचना केली. समता प्रेरणाभूमीचे सचिव मोहन जाधव यांनी गुलाब पुष्प देऊन उपस्थितांचे स्वागत केले. पहिल्या सत्राचे प्रास्ताविक ममता जाधव तर सूत्रसंचालन चंद्रशेखर जाधव यांनी केले. समतादूत सगुण जाधव यांनी समता प्रेरणाभूमीच्या संविधान व शिक्षण अधिकार प्रबोधन मेळाव्याचे कौतुक करून भारतीय संविधानातील खरा देशहिताचा उद्देश नागरिकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असून यासाठी साध्या सोप्या भाषेत संविधान साक्षरता अभियान राबवून संविधानाविषयीचे लोकांच्या मनातील गैरसमज सामाजिक संघटनांनी दूर करायला हवेत असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात गट चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये युवाशक्तीची चळवळीसाठी उदासीनता आहे का ? आंबेडकरी चळवळीत स्त्रियांचा सहभाग त्यांना न्याय देणार आहे का ? बहुजन शिक्षणाच्या नायक/ नायिका कोण आहेत? इत्यादी विषय ठेवण्यात आले होते. गटचर्चेचे सूत्रसंचालन दीपक जाधव यांनी केले. या चर्चेनंतर सिद्धार्थ जाधव निखिल जाधव वैष्णवी जाधव या युवा कार्यकर्त्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यानंतर आमचा शिक्षणाचा अधिकार, या विषयावर अंकुश कदम यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात, शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे, ज्ञान हाच सर्व सामर्थ्याच्या पाया असून आरक्षण हा प्रतिनिधित्वाचा अधिकार असल्याने विद्यार्थ्यांनी चळवळीतील आपली भूमिका समजून घ्यावी व आपल्यातील न्यूनगंडाची भावना काढून टाकावी असे प्रतिपादित केले. अध्यक्षीय भाषणात दीपक पडेलकर यांनी,महापुरुषांच्या नुसत्या प्रतिमा जपल्या आणि त्यांच्या शिकवणीचा विसर पडला तर आम्ही महापुरुषांच्या तत्त्वज्ञानाचे मारेकरी ठरू असे प्रतिपादन केले. उपस्थितांमध्ये कांता जाधव, वासुदेव जाधव, मिलिंद नेमळेकर,मोहन जाधव, पल्लवी जाधव , सिद्धार्थ जाधव शिवाजी जाधव अशोक जाधव गणपत जाधव, क्रांती राज सम्राट दादू जाधव दिलीप जाधव दिपाली जाधव निलेश जाधव रामा मसुरकर एकनाथ जाधव शिवाजी राठीये याच्यासह सुमारे 70 मान्यवर उपस्थित होते. शेवटी मोहन जाधव यांनी आभार मानले.