संशयित सागर कारिवडेकर अखेर गजाआड

Edited by: विनायक गांवस
Published on: April 26, 2026 22:17 PM
views 65  views

सावंतवाडी : गेल्या सहा महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणारा आणि खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी सागर कारिवडेकर याला सावंतवाडी पोलिसांनी अखेर कारिवडे येथून ताब्यात घेतले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

२६ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्री सर्वोदय नगर येथे दोन गटात मोठी मारामारी झाली होती. या प्रकरणी पुणे येथील शौनक सपकाळ यांनी तक्रार दाखल केली होती. संशयित आरोपींनी गाडी अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि मारहाण केली असा आरोप त्यांच्यावर होता. या तक्रारीवरून सागर कारिवडेकर आणि त्याच्या इतर ५ साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील इतर आरोपी तहा राजगुरू, तला राजगुरू (दोन्ही रा. बांदा) आणि नितीन मेस्त्री (रा. कोलगाव) यांना आधीच अटक करण्यात आली होती. मात्र, मुख्य संशयित सागर कारिवडेकर हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. आज २६ एप्रिल २०२६ रोजी सागर कारिवडेकर हा त्याच्या कारिवडे येथील सासरवाडीला येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, हवालदार महेश जाधव आणि महेश निरवडेकर यांच्या पथकाने तातडीने कारिवडे परिसरात सापळा रचला. रात्री ७ ते ८ च्या सुमारास तो परिसरात येताच पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. सागर कारिवडेकर याच्यावर ठाणे आणि मुंबई येथे देखील आर्थिक व्यवहारांशी संबंधित गुन्हे दाखल आहेत. सकपाळ, देवकाते यांसारख्या गुंतवणूकदारांवर आपल्या माणसांकरवी हल्ला केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे.

या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे आणि जयेश खंदरकर करत आहेत.