
वैभववाडी : येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या ९ वर्षीय बालकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण करत रुग्णालयाची तोडफोड केली. या घटनेमुळे रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकार रविवारी (ता. २७) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, कोकिसरे नारकरवाडी येथील ९ वर्षीय बालकाला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉ. वैभव मोरे यांनी तातडीने तपासणीसाठी घेतले. मात्र तपासणीनंतर बालकाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
ही माहिती समजताच मृत बालकाचे नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी डॉ. मोरे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्यासोबत असलेल्या काही ग्रामस्थांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर रुग्णालयाच्या दरवाजाची तोडफोड करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर हे कर्मचाऱ्यांसह तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी डॉक्टरांना सुरक्षित ठिकाणी हलविले. या घटनेनंतर रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते.येथील वातावरणही तणावग्रस्त बनलं होतं.दरम्यान, मृत बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कणकवली येथे पाठविण्याची प्रक्रिया सुरू होती.
*डॉक्टरांचे स्पष्टीकरण*
“मृत बालकाला विविध आजार होते. त्याच्यावर अन्य ठिकाणी उपचार सुरू होते. आज सायंकाळी त्याला रुग्णालयात आणण्यात आले. मात्र तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता,” असे डॉ. वैभव मोरे यांनी सांगितले.











