
सावंतवाडी : अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सदानंद मनोहर कांबळी, (रेवंडी, मालवण) आणि भानू दाजी तळगावकर (पडवे, ओरोस, ता. कुडाळ) यांना अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचा 'सुवर्ण महोत्सवी सेवाज्येष्ठ पुरस्कार' नुकताच जाहीर झाला आहे. प्रत्येकी ५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सदर पुरस्कार चंद्रशेखर धानजी, कणकवली यांनी आपले वडील कै. मनोहर जयराम धानजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रायोजित केलेला आहे. कै. मनोहर धानजी हे साहित्य, संगीत, शिक्षण, अध्यापन यातील मर्मज्ञ आणि जाणकार मान्यवर होते. अशी माहिती सदर पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्रकाश किरात पेडणेकर यांनी दिली.
सदर पुरस्काराचे वितरण २० नोव्हेंबर २०२२ रोजी बिडये विद्यामंदिर केंद्रशाळा, आचरे नं. १ येथे दुपारी ठिक ३:३० वा. चंद्रशेखर हडप, (ज्येष्ठ सदस्य) यांच्या अध्यक्षतेखाली आणि रामचंद्र विष्णू आंगणे, उपशिक्षणाधिकारी जि. प. सिंधुदुर्ग, चंद्रशेखर धानजी, उज्वला चंद्रशेखर धानजी (प्रायोजक) आदींच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
पुरस्कार प्राप्त उभयता श्री. कांबळी आणि श्री. तळगावकर यांचे अभिनंदन करताना सुरेश ठाकूर, अध्यक्ष साने गुरुजी कथामाला मालवण म्हणाले की, "मालवण कथामालेच्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील या पुरस्काराचे मोल फार मोठे आहे. सदानंद कांबळी, भानू तळगावकर या उभयतांनी गेली चार दशके अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेसाठी आपले तन-मन-धन अर्पण करून सेवा केली. शाळा - शाळांत कथाकथन, मनोरंजनात्मक खेळ, कथाकथन शिबिरे, कथामालेची व्यक्तिमत्व विकास शिबिरे आदीसाठी आपले योगदान दिले. आज त्यांनी आपल्या वयाची जरी सत्तरी पार केलेली असली, तरी तरुणाला लाजवेल अशा उर्मीने ते दोघेही मुलांसोबत उभे राहून 'करी रंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे' ही उक्ती खऱ्या अर्थाने सार्थ करतात."
या पुरस्काराबद्दल श्री. विजय चौकेकर, अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक संघटना मालवण तसेच रामचंद्र आंगणे, उपशिक्षणाधिकारी, जि.प. सिंधुदुर्ग, सर्व सदस्य कथामाला, मालवण आणि कोमसाप, मालवण शाखा यांनी अभिनंदन केले आहे.