शैक्षणिक वाटचालीत कोणतीही अडचण आल्यास आम्ही नेहमीच पाठीशी : सचिन वालावलकर

दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न
Edited by: दिपेश परब
Published on: June 17, 2024 04:31 AM
views 106  views

वेंगुर्ले : गुणवंत विद्यार्थी घडवण्यात पालकांसाहित शिक्षकांचाही मोठा वाटा असतो. विविध माध्यमातून ते विद्यार्थी घडवत असतात. याची जाणीव मुलांनी ठेऊन आपण आपल्या पुढील जीवनात कोणत्या क्षेत्राकडे जाणार आहात हे काळजीपूर्वक पाउल उचलावे. भविष्यात आपल्याला सक्षमपणे उभे राहायचे असेल तर आपली हुशारी व शिक्षण  महत्वाचे आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे पक्षभेद बाजूला ठेऊन सातत्याने निस्वार्थी काम करत आहेत. ते सर्व ठिकाणी पोचू शकत नाहीत, त्यामुळे त्यांचे विचार, त्यांच्या संकल्पना आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही सर्वजण सातत्याने करत आहोत. दिपभाई केसरकर मित्रमंडळ सातत्याने विद्यार्थ्यांना मदत करत असते. भविष्यात सुद्धा कोणत्याही प्रकारची अडचण विद्यार्थ्यांना आल्यास ती मंडळाच्या वतीने निश्चित दूर करण्यात येईल असे प्रतिपादन जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांनी वेंगुर्ले येथे केले. 


दीपकभाई केसरकर मित्रमंडळ व वेंगुर्ला तालुका शिवसेना यांच्यावतीने आज रविवारी (१६ जून) आयोजित करण्यात आलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील दहावी व बारावी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात सचिन वालावलकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्योजक सुभाष कुबल, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, जिल्हा संघटक सुनील डुबळे, शहरप्रमुख उमेश येरम, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, जेष्ठ मार्गदर्शक मह सामंत, कोचरा सरपंच योगेश तेली, डॉ आर एम परब, युवासेना शहरप्रमुख संतोष परब, उपतालुकाप्रमुख सचिन नार्वेकर, खानोली उपसरपंच सचिन परब आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांना दिपकभाई केसरकर मित्रमंडळ यांच्यावतीने आकर्षक भेटवस्तू व वालावलकर महासेवा ई केंद्राच्या संचालिका समीक्षा वालावलकर यांच्या तर्फे स्कुल बॅग देऊन गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना तालुकाप्रमुख नितिन मांजरेकर म्हणाले की, आजपर्यंत कागदावरची स्वप्न केसरकर यांनी सत्यात उतरवली. भावी पिढी यशस्वितेकडे जावी, इथल्या महिला, युवक यांना सबळ काराव असे त्यांचे स्वप्न आहे. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात शेती,  आंबा काजू पीक, मत्स्य व्यवसाय आहे. यात युवकांनी येत्या काळात उन्नती करावी . यासाठी दीपक केसरकर यांनी विविध योजना त्यांनी आणल्या असून भविष्यात आपण विद्यार्थ्यांनी योग्य मार्ग निवडून आपल्या उज्वल यश संपादन करावे. आम्ही नेहमीच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे वचनही यावेळी नितीन मांजरेकर यांनी दिले. 

    उद्योजक सुभाष कुबल यांनी रिक्षाचालक, भाजीविक्रेता ते उद्योजक बनण्याचा खडतर प्रवास विद्यार्थ्यांना सांगितला. ते म्हणाले मनात ध्येय होत ताकद होती म्हणून हे शक्य झालं. यामुळे मनात जिद्द ठेवा जिद्द शिक्षणाशिवाय काही नाही. आपण समाजच देणं लागतो या नात्याने आपल्या शिक्षणाचा उपयोग हा समाजासाठी करा. यावेळी मार्गदर्शन करताना सुनील डुबळे म्हणाले, कोकणातील मूल ही सुपीक डोक्याची असतात म्हणून आता लातूर पॅटर्न जाऊन कोकण पॅटर्न आला आहे. या मातीने अनेक रत्ने या देशाला दिली आहेत. आज जो शालेय शिक्षणात आमूलाग्र बदल दिसत आहे तो दीपक केसरकर यांच्यामूळे शालेय विद्यार्थ्यांना काय नवी देता येईल असा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. भविष्यात काही अडचणी आल्यास आपल्या पाठीमागे खंबीर पाने उभे राहू. 

    यावेळी बोलताना उमेश येरम म्हणाले, आवड ही विचारातून निर्माण होते. यामुळे योग्य विचार करून पुढील करियर निवडा. अगोदर ध्येय निश्चित करून वाटचाल करा यश निश्चित आहे. दीपक केसरकर यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल, शिक्षण कसे सोपे होईल याबाबत अभ्यास करून, फार बारकाईने विचार करून वाटचाल केली असल्याचे त्यांनी सांगितले. तर आपण एक महत्वाचा टप्प्यावर आलो आहोत. यापुढे आपलं एक ध्येय असलं पाहिजे. एखाद्या दगडातून आकर्षक मूर्ती तयार केली जाते त्यामागे त्या मुर्तीकाराचे मोठे योगदान असते. असाच शिक्षकांचाही विद्यार्थी घडवण्यात मोठा वाटा आहे. आपल्या यशाचे सातत्य कायम ठेवा व आई वडील, आपले गाव व तालुक्याचे काम उज्वल करा असे जेष्ठ मार्गदर्शक महेश सामंत यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैभव खानोलकर यांनी केले.