
कणकवली : एस. एम. ज्युनिअर कॉलेजमधील सायन्स, कॉमर्स व व्यवसाय अभ्यासक्रम विभागातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व सदिच्छा कार्यक्रम कै. सदानंद पारकर सभागृहामध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाला कणकवली शिक्षण संस्था कणकवलीचे पदाधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक व सर्व शिक्षक उपस्थित होते.
प्रास्ताविकपर शुभेच्छा देताना प्राचार्य जी एन बोडके यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाताना घ्यावयाच्या दक्षता, ताणतणाव विरहित परीक्षेसाठी उपाययोजना समजावून सांगितल्या व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ओंकार सावंत, ऋषिकेश पाटील, कु गीतांजली नलावडे, कु.पूर्वा घाडी व कु.पूजा मेस्त्री या विद्यार्थ्यानी कॉलेजमधील दोन वर्षातील ज्ञानदान, मार्गदर्शन याबद्दल सर्व गुरुजनांचे आभार मानले तसेच यापुढील काळातही दोन वर्षातील अनुभवांची शिदोरी जीवन जगताना आम्हाला आधारभूत ठरेल अशी आशा व्यक्त केली.
व्यवसाय अभ्यासक्रम विभागातील शिक्षक श्री आर ए काळे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजन, महत्वाकांक्षा यांचे महत्त्व पटवून दिले.तर सौ. एम आर पाटील यांनी आयुष्यातील नकारात्मकता, वाईट संगत, व्यसन यांची संगत सोडून सकारात्मकता, सराव, सादरीकरण यावर भर देण्याची विनंती विद्यार्थ्यांना केली. उपकार्याध्यक्ष श्री एम ए काणेकर यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये शिक्षकांचे व पालकांचे महत्त्व सांगताना अभ्याससोबतच आपले छंद जपा, आरोग्य उत्तम ठेवा असे मार्गदर्शन केले.
आज जगभरात एस एम च्या विद्यार्थ्यांनी आपला नावलौकिक वाढवला आहे. त्या यादीत तुमचाही समावेश व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करत कितीही मोठे झाला तरी आई-वडिलांना विसरू नका असा संदेश सचिव श्री डी एम नलावडे यांनी विद्यार्थ्यांना दिला. चेअरमन डॉ. एस. एन. तायशेटे यांनी विद्यार्थ्यांना बारावी नंतरच्या करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. आयुष्यात मिळालेले पद कोणतेही असो पण त्यामध्ये निष्ठा महत्त्वाची आहे. तुम्ही काहीही करू शकता पण त्यासाठी जिद्द, चिकाटी आवश्यक आहे. त्याबरोबरच व्यसनापासून दूर राहण्याचा मोलाचा उपदेशही त्यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये केला.
एस. एम. आणि शिस्त हे समीकरण सर्वांना ज्ञातच आहे. यापुढील आयुष्यातही ती शिस्त विद्यार्थ्यांच्यामध्ये राहावी अशी अपेक्षा व्यक्त करत उपप्राचार्य श्री आर एल प्रधान यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी. डी. हिर्लेकर यांनी केले.