उद्धव ठाकरेंच्या वाढदिनी रूपेश राऊळांचे मंत्री केसरकरांवर 'बाण'

Edited by: विनायक गावस
Published on: July 27, 2023 15:11 PM
views 228  views

सावंतवाडी : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघातच शिक्षणाचे बारा वाजले आहेत. तालुक्यातील तब्बल २२ प्राथमिक शाळांना अद्यापपर्यंत पुस्तकं मिळालेली नाहीत. म्हणूनच, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेनं सामाजिक बांधिलकी म्हणून विद्यार्थांना मोफत पुस्तकांच वाटप केलं. केवळ गजाली सांगणाऱ्या मंत्री  केसरकरांच कर्तृत्व मतदारसंघात दिसून आलंय असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केला.

तर शिक्षणासह आरोग्य क्षेत्रात मंत्री कमी पडल्यानं गावागावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात जात औषधांचा तुटवडा भासत असलेल्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त औषधे वाटप करण्यात आल्याची माहिती रूपेश राऊळ यांनी देत मंत्री केसरकरांवर टीकेचे बाण सोडले. यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, सरपंच गुणाजी गावडे, योगेश नाईक, सुनील गावडे, आबा सावंत आदी उपस्थित होते.