हा विजय स्वाभिमानी जनतेचा ; रुपेश पावसकर भावूक

मात्तबरांना पाजलं पाणी
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: February 10, 2026 14:00 PM
views 127  views

कुडाळ :  कोणत्याही प्रस्थापित पक्षाचा शिक्का नाही की बड्या नेत्याचा हात पाठीशी नाही, तरीही केवळ जनसामान्यांच्या प्रेमाच्या आणि विश्वासाच्या जोरावर जिल्हा परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार  रुपेश अशोक पावसकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. "हा विजय माझा नसून माझ्या स्वाभिमानी जनतेचा आहे," अशा भावना नवनिर्वाचित जि.प. सदस्य रुपेश पावसकर यांनी व्यक्त केल्या.

निवडणुकीच्या निकालाने अनेक दिग्गजांना धक्का दिला असून,  पावसकर यांचा विजय हा 'शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास' ठेवणाऱ्या मतदारांचा कौल असल्याचे मानले जात आहे. विजयानंतर मतदारांशी संवाद साधताना पावसकर भावूक झाले होते. ते म्हणाले की, "माझ्यावर श्री देव कलेश्वर, माऊली, लक्ष्मीनारायण, सातेरी आणि प.पु. राऊळ महाराज यांची कृपा आहे. मी एकटा नव्हतो, तर विकासाची आस असलेला प्रत्येक सामान्य माणूस माझ्यासोबत लढत होता."

'अपक्ष आहे, पण हतबल नाही'

आपल्या विजयाचे विश्लेषण करताना त्यांनी सामान्य मतदारांनी प्रचारादरम्यान दिलेल्या प्रेमाचा आवर्जून उल्लेख केला. "कुणी दिलेला कपभर चहा असेल किंवा पाठीवर मारलेली शाबासकीची थाप, याच गोष्टींनी मला लढण्याचे बळ दिले. मी अपक्ष म्हणून निवडून आलो असलो तरी मी हतबल नाही. पक्षाचे बंधन नसल्याने माझा पहिला शब्द आणि कृती फक्त माझ्या मतदारसंघातील जनतेसाठी असेल," अशी ग्वाही त्यांनी दिली.

विकासाचा रोडमॅप तयार

विजयाचा जल्लोष साजरा करतानाच त्यांनी कामाचा ध्यासही व्यक्त केला. रस्ते, पाणी, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत प्रश्नांसाठी अहोरात्र झटणार असल्याचे त्यांनी सांगितले. "विजयाचा गुलाल उतरला तरी, तुमच्या सुखा-दुखात धावून येणारा हक्काचा माणूस म्हणून मी कायम उपलब्ध असेन," असे वचन त्यांनी यावेळी दिले. हा विजय लोकशाहीत सामान्य माणूस आणि कार्यकर्त्यांची ताकद काय असते, हे दाखवून देणारा ठरला आहे.