वामनाश्रम महास्वामीजींच्या हस्ते आत्मेश्वर देवतेवर 'रुद्राभिषेक'

Edited by: विनायक गांवस
Published on: March 26, 2026 14:17 PM
views 26  views

सावंतवाडी : माठेवाडा येथील श्री देव आत्मेश्वर मंदिरात काशी तथा हळदीपूर मठाधिपती, वैश्य कुलगुरू प.पू. श्री श्री वामनाश्रम महास्वामीजी यांच्या शुभहस्ते श्री देव आत्मेश्वर देवतेवर 'रुद्राभिषेक' सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.

 रात्री १० वाजता सुरू झालेल्या या विधीवत पूजेमध्ये महास्वामीजींनी महादेवाला अभिषेक केला. यावेळी मंत्रोच्चाराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या धार्मिक विधीसाठी मंदिराचे मुख्य पुजारी गणेश पेंढारकर आणि ओटवणे येथील समीर भिडे गुरुजी यांचे पौरोहित्य लाभले. मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या सोहळ्याचे नियोजन केले होते.रुद्राभिषेक पूर्ण झाल्यानंतर उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना महास्वामीजींनी प्रवचन दिले. श्री भोलेनाथ शंकर, श्री देव काशीविश्वेश्वर आणि श्री देव गोकर्ण या देवतांचे महात्म्य त्यांनी विशद केले. तसेच आद्य शंकराचार्य यांच्या कार्यावर आणि त्यांच्या आध्यात्मिक वारशावर प्रकाश टाकला. प्रवचनानंतर महास्वामीजींनी उपस्थित भाविकांना फल-मंत्राक्षता देऊन आशीर्वाद दिले.

या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सावंतवाडी शहरासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वैश्य समाज बांधव, भगिनी, गुरुसेवक आणि मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.