कणकवलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा

दोन पेट्रोल पंप बंद
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 26, 2026 13:15 PM
views 102  views

कणकवली : शहरात सध्या पेट्रोल व डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. इंधनाचा पुरवठा खंडित झाल्यामुळे शहरातील बस स्टॅन्ड शेजारील व पोलीस स्थानकात शेजारी  दोन पेट्रोल पंप पूर्णपणे बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे जिथे पेट्रोल उपलब्ध आहे तिथे वाहनांची लांबच लांब रांग लागल्याचे चित्र काही ठिकाणी पाहायला मिळाले. अनेक वाहनचालकांना इंधन न मिळाल्याने परत फिरावे लागत आहे, तर काहींना पर्यायी पंपांचा आधार घ्यावा लागत आहे.

दरम्यान, इंधन टंचाईमागे पुरवठा साखळीतील अडथळे कारणीभूत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित यंत्रणेकडून लवकरात लवकर पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

शहरातील नागरिकांनी घाबरून साठेबाजी न करता संयम बाळगावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. लवकरच परिस्थिती पूर्ववत होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे.