LIVE UPDATES

उंबर्डेत भाजपचा रडीचा डाव, गरीबाच्या रोजीरोटीवर घाव

पराभव होणार हे लक्षात आल्यावर विरोधकांकडून घाणेरडे राजकारण | संदीप सरवणकर यांचा आरोप
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 06, 2022 16:28 PM
views 634  viewes

वैभववाडी : उंबर्डे गावात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाकडून गलिच्छ राजकारण करण्यात येत आहे. उध्दव बाऴासाहेब ठाकरे पक्षाच्या सरपंच पदाच्या उमेदवार नंदिनी महेश चव्हाण यांच्यावर दबाव टाकण्यासाठी त्यांच्या पतीच्या स्टाँलबाबत तक्रार केली आहे. यावरून भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली हे दिसून येते. एखाद्या गरीबाची रोजीरोटी हिरावून घेण्यापेक्षा थेट निवडणुकीला सामोरे जाव. जनता योग्य तो निर्णय देईल. पराभव होणार हे लक्षात आल्यावर विरोधकांकडून असे घाणेरडे राजकारण सुरू आहे, असा आरोप शिवसेना जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर यांनी केला आहे.

सरवणकर यांनी दिलेल्या प्रसिद्धि पत्रकात म्हटले आहे की, उंबर्डे बसस्थानक नजीक गावचे रहीवाशी महेश चव्हाण यांच छोटस दुकान आहे. त्यावर चव्हाण कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू आहे.तसेच श्री चव्हाण हे उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे उंबर्डे गावचे शाखाप्रमुख आहेत.त्यांच्या पत्नी नंदिनी चव्हाण या सरपंच पदासाठी उमेदवार आहेत. त्यामुळे भाजपाकडून चव्हाण यांच्या त्या दुकानाची तक्रार करण्यात आली.ते दुकान अनाधिकृत आहे अशी तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कडे केली होती. मात्र ती फेटाळण्यात आली. यावरून भाजपाकडून किती खालच्या पातळीच राजकारण सुरू आहे हे जनतेला समजले आहे. निवडणुकीत पराभव होणार असल्याचे दिसून आल्यामुळे असे प्रकार केले जात आहेत. एका गरीबाच्या रोजीरोटीवर पाय देण्याचा प्रयत्न केला जात आहे. गावात रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजारा दिवशी जिल्हाबाहेरील भाजी, फळे व इतर फेरीवाले गावचे रस्त्यावर ठाण मांडून बसतात ते यांना चालते. मात्र गावातील एक होतकरू तरुण आपल पोट त्या दुकानाच्या माध्यमातून भरत असेल तर यांना त्याचा पोटशूळ का? निवडणूक रणांगणात लढवावी. असा रडीचा डाव खेळून ती जिंकता येणार नाही. भाजपा पँनेलला पराभव दिसू लागल्याने असले उद्योग करण्याचे त्यांना सुचत आहे.गावची जनता सुज्ञ आहे, त्यांना मतपेटीतून योग्य उत्तर देईल, अस श्री. सरवणकर यांनी म्हटले आहे.