सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हयातील बीएसएनएल (BSNL) नेटवर्कची दयनीय अवस्था सुधारण्यासाठी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी बीएसएनएल विभागाला केलेल्या सूचनेनंतर त्वरित कार्यवाही करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नेटवर्कची असलेली गंभीर समस्या सोडवण्यासाठी ना. नितेश राणे यांच्या सूचनेनुसार तातडीने ‘पोर्टेबल सेटअप’ बसवण्यात आला असून, यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालय आणि संपूर्ण परिसरात बीएसएनएलचे नेटवर्क पूर्ण क्षमतेने उपलब्ध झाले आहे.
मुंबईतील बैठकीचा सकारात्मक परिणाम
काही दिवसांपूर्वीच ना. नितेश राणे यांनी मुंबईत बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली होती. जिल्ह्यातील विस्कळीत सेवा आणि रेंजअभावी होणारी नागरिकांची गैरसोय त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर जिल्ह्यातील १०२ टॉवर्सची क्षमता वाढवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते.
१०२ टॉवर्स आता पूर्ण क्षमतेने सुरू
जिल्ह्यात यापूर्वी मंजूर झालेले १०२ टॉवर्स केवळ सौरऊर्जेवर अवलंबून असल्याने पावसाळ्यात किंवा ढगाळ वातावरणात बंद पडत असत. ही तांत्रिक अडचण ओळखून ना. नितेश राणे यांनी या टॉवर्सना तातडीने वीज जोडणी (Electrical Connection) देण्यासाठी महावितरण आणि बीएसएनएलमध्ये समन्वय घडवून आणला. आता हे टॉवर्स सौरऊर्जा आणि महावितरण अशा दोन्ही यंत्रणेवर चालणार असल्याने जिल्ह्यातील नेटवर्कची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
बीएसएनएलचे नवे ३१ टॉवर्स मंजूर
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्ह्यात नवीन ३१ टॉवर्स मंजूर झाले आहेत. यामध्ये या दोन्ही नेत्यांचा सिंहाचा वाटा आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रेंज नसल्याने अधिकारी आणि नागरिकांना मोठा फटका बसत होता. कायमस्वरूपी टॉवर उभारणीसाठी निविदा प्रक्रियेमुळे विलंब होण्याची शक्यता होती. हा विलंब टाळण्यासाठी ना. नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना 'पोर्टेबल सेटअप'चे निर्देश दिले. त्यानुसार आता तातडीने ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांनी आणि कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.










