
दोडामार्ग : युतीचे संकेत मिळत असले तरी माटणे जिल्हा परिषद मतदारसंघातून शिंदे गटाची शिवसेना आपला स्वतंत्र उमेदवार उभा करणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. यासंदर्भात झरेबंबर ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल शेटकर यांनी मतदारसंघातील जनतेच्या वतीने ठाम भूमिका मांडली आहे.
ही भूमिका मांडताना ते म्हणतात की, मागील १५ वर्षांपासून माटणे जि.प. मतदारसंघातून भाजपचा उमेदवार निवडून दिला जात असला, तरी भाजप किंवा संबंधित उमेदवारांनी सत्तेतील महत्त्वाच्या पदांवर राहूनही माटणे मतदारसंघातील मूलभूत प्रश्न सोडवण्यात अपयश आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
विशेषतः तिलारी प्रकल्पाचे पाणी मटाने मतदारसंघातील किमान १३ गावांना मिळावे, यासाठी प्रभावी प्रयत्न होणे अपेक्षित होते. मात्र, याच विभागात ठेकेदारी करणाऱ्या उमेदवाराला पाण्यासाठी तळमळणारा माटणे मतदार कधीच दिसला नाही, अशी टीका शेटकर यांनी केली.
तसेच, माटणे भागातील अनेक शेतकऱ्यांनी व स्थानिकांनी आपल्या जमिनी परप्रांतीय लोकांना विकल्या. काही ठिकाणी खोटी कागदपत्रे जोडून जमिनी बळकावल्या गेल्या, मात्र यावरही लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घेतली नाही, असे त्यांनी सांगितले.
“बोलण्यासारखे खूप आहे. मात्र फक्त १००–२०० मीटर रस्ते करणे म्हणजे विकास नव्हे,” असा टोलाही त्यांनी लगावला. १५ वर्षे मतदारसंघावर अधिराज्य गाजवणाऱ्या भाजपने नेमकी कोणती विकासकामे केली, याची यादी जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली. या सर्व पार्श्वभूमीवर, माटणे मतदारसंघातून सेना निवडणूक लढवणारच असा निर्धार व्यक्त करताना शेटकर म्हणाले की, “जर आम्हाला उमेदवारी मिळाली नाही, तर भाजपला कोणतीही मदत केली जाणार नाही. ही माझी आणि माझ्या कार्यकर्त्यांची ठाम भूमिका आहे.”
या वक्तव्यामुळे माटणे मतदारसंघातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीतील मतभेद उघडपणे समोर येत आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.










