आरपीडीच्या ग्रंथालयाला प्रा. एल.पी.पाटील यांच्याकडून १२० पुस्तकांची देणगी

Edited by: विनायक गावस
Published on: September 08, 2023 15:55 PM
views 96  views

सावंतवाडी : येथील आरपीडी ज्युनिअर कॉलेजचे माजी प्राध्यापक अकाउंट्स विषयाचे तज्ञ एल. पी. पाटील यांनी बुक किपींग & अकांउंटन्सी या विषयाची १२० पुस्तके शाळेच्या ग्रंथालयाला विनामुल्य भेट दिली. या पुस्तकांची किंमत ४२ हजार एवढी आहे. ही पुस्तके १२ वी कॉमर्ससाठी उपयुक्त असून या पुस्तकाचे लेखकही प्रा. एल. पी. पाटील आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभर ही पुस्तके Key to Sure Success यासाठी वापरली जातात. त्यांच्या या देणगीबाबत मुख्याध्यापक जगदीश धोंड, उपमुख्याध्यापक अरविंद साळगांवकर, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, ग्रंथपाल देविदास कोरगांवकर, शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर यांनी प्रा. पाटील यांचे आभार मानले.


प्रा.पाटील यांचे मुळगांव बेळगांव येथील असून १९८५ ते १९९३ या काळात मिठबांव, देवगड येथे प्राध्यापक म्हणून नोकरीला होते. तेथे ते अतिरिक्त होऊन १९९३ मध्ये दोडामार्ग ज्युनि. कॉलेजला आले. त्यांची गुणवत्ता ओळखून शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत यांनी २०१० मध्ये त्यांना आरपीडी ज्युनि. कॉलेज, सावंतवाडी येथे नियुक्ती दिली. २०१८ मध्ये ते नियत वयोमानानुसार आरपीडीमधून निवृत्त झाले. विद्यार्थ्यांना अकांउटंन्सी विषयात १०० पैकी १०० मार्कस मिळविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. सन २०१० ते २०१८ या वर्षांत आरपीडी ज्युनि. कॉलेजच्या ९ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० मार्कस मिळवून महाराष्ट्रात या  विषयात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. ही परंपरा कायम रहावी म्हणून ते आजही प्रयत्न करीत आहेत. या विद्यार्थ्यांचे कौतुक व्हावे म्हणून त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळाकडे रक्कम रु.२५ हजार ठेव ठेवली असून रक्कमेच्या व्याजातून विद्यार्थ्यांना दरवर्षी बक्षिसे दिली जातात. विशेष म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले विद्यार्थी चार्टर्ड अकाउंटंट म्हणून कार्यरत आहेत.