
सावंतवाडी : स्वर्गीय रो. बाळभाई बांदेकर यांच्या स्मृतीला आदरांजली वाहण्यासाठी रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीने आयोजित केलेल्या 'महा रक्तदान शिबिराला' रक्तदात्यांनी मोठा प्रतिसाद दिला. सोमवार, १८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत रोटरी ट्रस्ट हॉल, सबनीसवाडा, सावंतवाडी येथे हे शिबिर उत्साहात पार पडले. या उपक्रमात ६० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
यावेळी रोटरी क्लब सावंतवाडीचे अध्यक्ष रोटरी ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना रक्तदानाचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, “रक्तदान हे खरे जीवनदान आहे. आपल्या शरीरातील रक्त हे काही दिवसांनी नैसर्गिकरित्या पुन्हा तयार होते, त्यामुळे एका व्यक्तीने केलेले रक्तदान हे दुसऱ्या व्यक्तीसाठी जीवनवाहिनी ठरू शकते. आज आपण दिलेले रक्त कुणाच्यातरी वडिलांना, मुलाला किंवा आईला नवे आयुष्य देईल. हे केवळ एक सामाजिक कार्य नाही, तर एक माणुसकीची कृती आहे. या शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.”
हा उपक्रम रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीने सार्थक फाऊंडेशन आणि ऑनकॉल रक्तदाता संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता. या शिबिरामध्ये गोवा मेडिकल कॉलेजच्या अनुभवी डॉक्टरांनी आणि अधिकारी वर्गाने सहभाग घेऊन रक्त संकलनाचे कार्य केले. संकलित झालेले रक्त गरजू रुग्णांसाठी जीवनदान ठरणार आहे, असे आयोजकांनी सांगितले.
'रक्तदान महादान' या उक्तीला सार्थ ठरवणाऱ्या या शिबिरात अनेक सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला. यात युवा रक्तदाता संघटना, पत्रकार संघ सावंतवाडी, सामाजिक बांधिलकी संघटना, रोट्रॅक्ट क्लब सावंतवाडी आणि इनरव्हील क्लब सावंतवाडी यांचा समावेश होता.
यावेळी इतर मान्यवरांनीही रक्तदानाचे महत्त्व विशद केले. सावंतवाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर यांनी सांगितले की, “पत्रकार म्हणून आम्ही अनेक दुर्दैवी घटना पाहतो. वेळीच रक्त न मिळाल्यामुळे अनेक जीव धोक्यात येतात. अशा वेळी रक्तदान शिबिरे ही खऱ्या अर्थाने देवदूत ठरतात.” तर ऑनकॉल रक्तदाते संस्थेचे सचिव बाबली गवंडे म्हणाले की, “प्रत्येक रक्तदात्याने स्वतःला रक्तदाता म्हणून नोंदवून घेतले पाहिजे. यामुळे गरज पडल्यास वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मदत होते. तुमचा एक छोटासा प्रयत्न एखाद्याचा जीव वाचवू शकतो.” सामाजिक बांधिलकी संघटनेचे अध्यक्ष सतीश बागवे यांनीही तरुण पिढीला आवाहन केले की, “तरुणांनी रक्तदानाला आपले कर्तव्य मानले पाहिजे. आज आपण रक्तदान केले, तर उद्या आपले मित्र, नातेवाईक किंवा गरजूंसाठी ते उपयोगी पडेल. रक्तदानामुळे शरीराला कोणतीही हानी होत नाही, उलट हे एक आरोग्यदायी पाऊल आहे ,असे स्पष्ट केले.
या शिबिरावेळी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर श्री. मदने, दिनेश गावडे, नॅबचे अध्यक्ष अनंत उचगांवकर, सामाजिक बांधिलकी अध्यक्ष सतीश बागवे, रवी जाधव, रुपा मुद्राळे, रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष सिद्धेश सावंत आदींसह केदार बांदेकर, प्रवीण परब, गोवा मेडिकल कॉलेजचे डॉ. शुभम व अधिकारी वर्ग तसेच सर्व रोटरी क्लब व रोट्रॅक्ट क्लबचे सदस्य, रक्तदाते व इतर मंडळी उपस्थित होती.