
चिपळूण : रोटरी क्लब ऑफ चिपळूणच्या नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा बुधवार, १६ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता राधाताई लाड सभागृह, चिपळूण येथे पार पडणार आहे. वर्ष २०२५-२६ या कार्यकाळासाठी अध्यक्षपदी सुनील रेडीज, सेक्रेटरीपदी अभिजीत चव्हाण, तर खजिनदारपदी रोहन देवकर यांची निवड करण्यात आली आहे.
या सोहळ्यास लेनी दि कोस्टा (डी.जी. २०२६-२७), अजय मेमन (डेप्युटी डी.आर.एफ.सी. आणि डी.जी.एस.सी.), अभिजीत वाळके (डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी इव्हेंट्स २०२६-२७) आणि प्रसाद सागवेकर (ए.जी. २०२५-२६) हे मान्यवर पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
नवीन अध्यक्ष सुनील रेडीज हे गेल्या अकरा वर्षांपासून रोटरी क्लबच्या विविध उपक्रमांत सक्रिय असून, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर म्हणून कार्यरत आहेत. ‘रेडीज असोसिएट्स’ या नावाने स्वतःचा व्यवसाय ते यशस्वीपणे चालवतात. समाजसेवा, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचे योगदान आहे. ते चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे सदस्य, मुरलीधर देवस्थानचे खजिनदार आणि जिल्हा ग्राहक संघटनेचे अशासकीय सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत.
सेक्रेटरी अभिजीत चव्हाण हे २०१७ पासून रोटरी क्लबशी जोडले गेले आहेत. 'सिग्नेचर हॉलिडेज' या नावाने पर्यटन व्यवसायात त्यांना २५ वर्षांचा अनुभव आहे. ‘वीणा वर्ल्ड’ या नामांकित संस्थेचे चिपळूणमधील ते गेली ११ वर्षे सेल्स पार्टनर आहेत. त्यांचे व्यवस्थापन कौशल्य क्लबच्या उपक्रमांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
खजिनदारपदी निवडले गेलेले रोहन देवकर हे क्लबमध्ये ११ वर्षांपासून सक्रिय असून, लीकर मॅन्युफॅक्चरिंग आणि डिस्ट्रीब्युशन व्यवसायात कार्यरत आहेत. सामाजिक उपक्रमांत त्यांचा सहभाग नियमित आणि प्रेरणादायी आहे.
या सोहळ्यास रोटरी क्लबचे सर्व सदस्य, शहरातील मान्यवर व विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहणार असून, उपस्थित राहण्याचे आवाहन मावळते अध्यक्ष अविनाश पालशेतकर, सेक्रेटरी राजेश ओतारी आणि खजिनदार स्वप्निल चिले यांनी केले आहे.
रोटरी क्लब चिपळूणने आतापर्यंत आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन, जलसंधारण अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय उपक्रम राबवले आहेत. नव्या कार्यकारिणीतून नवकल्पना आणि सामाजिक बदल घडवणारे उपक्रम राबवले जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.