
दोडामार्ग : झरेबांबर तिठा येथे भाजी वाहतुक करणाऱ्या टेम्पोच्या धडकेत एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. मोठ्या वर्दळीच्या या तिठ्यावरील अरुंद रस्ता, गतिरोधकांचा अभाव यामुळे अपघात घडला होता. त्या पार्श्वभूमीवर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून स्थानिकांच्या मदतीने रस्त्यालगत मातीचा भराव घालून रस्ता रुंद धोकादायक झाड बाजूला केले. या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
घाटमाथ्यावरून गोव्याला जाण्यासाठी दोडामार्ग-विजघर राज्य मार्ग जवळचा आहे. त्यामुळे अलीकडच्या काही वर्षांत या मार्गावरील वर्दळ वाढली आहे. शिवाय राज्यमार्गाचे नूतनीकरण झाल्याने वाहने सुसाट जातात. या राज्य मार्गावरील झरेबांबर तिठा येथे वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मांगेली गावांसह इतर पंचक्रोशीचा मुख्य जोडरस्ता आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रेलचेल सुरू असते. तिठ्यावर एक मोरी असून तेथे रस्ता अरुंद झाला आहे. शिवाय जोड रस्त्याच्या ठिकाणी देखील रस्ता अरूंद असल्यामुळे वाहना़ंचे अपघात होत असतात. मात्र शुक्रवारी एका भाजी वाहतुक करणाऱ्या टेम्पोची धडक बसून एका सात वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
या दुर्घटनेनंतर तालुकावासियांचा उद्रेक झाला. सार्व. बांध. उपविभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी संतप्त तालुकावासियांनी धारेवर धरले. घटनास्थळीचा रस्ता रुंद व्हावा ही आग्रही मागणी राहिली. त्या पार्श्वभूमीवर रस्ता रुंद व्हावा यासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी पुढाकार घेतला. यावेळी त्यांना स्थानिकांनी मोठे सहकार्य केले. डंपरने तिठ्यावरील रस्ता बाजू पट्टीवर माती टाकली. त्यानंतर ती पसरवून तेथील रस्ता रुंद केला. व त्याठिकाणी असलेली धोकादायक झाड बाजूला केले. त्यांच्या या कामाचे सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.