
कुडाळ : झाराप-साळगाव-माणगाव रस्त्याची सध्या अत्यंत दुरवस्था झाली असून, जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे, त्यातच पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही, परिणामी अपघाताची शक्यता वाढली आहे.
साळगाव आणि माणगाव येथील ग्रामस्थांसाठी कुडाळ येथे येण्याकरिता हा अत्यंत सोयीस्कर मार्ग असल्याने अनेक जण याच रस्त्याचा वापर करतात. मात्र, खड्ड्यांमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे केवळ वाहनचालकांनाच नव्हे, तर रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. खड्ड्यांमधून वाहन गेल्यास चिखलाचे पाणी आजूबाजूच्या लोकांवर उडत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
या रस्त्यामुळे होणारे अपघात आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेता, या खड्ड्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी प्रवासी आणि ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.