
सावंतवाडी : शहरातील भटवाडी परिसरात प्रस्तावित नळ पाणी योजनेसाठी केलेल्या पाईपलाईनच्या खोदकामामुळे रस्त्याच्या कडेला मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे रस्त्याची माती वाहून गेल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. तसेच अनेक ठिकाणी धोकादायक झाडे आणि वीज खांब असल्याने यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश सावंतवाडी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांनी दिले आहेत. त्यांनी शुक्रवारी स्वतः भटवाडी परिसराची पाहणी केली. या पाहणीदरम्यान माजी नगरसेविका दिपाली भालेकर, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, बबन डिसोजा, बबलू डिसोजा, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, समिधा नाईक, श्रीमती लाड, प्रसाद राणे बंड्या केरकर अनिल आयरे, रवी नाईक गेगरी डान्टस श्री प्रभू देसाई श्री तेंडुलकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
दीड महिन्यापूर्वी नळ पाणी योजनेसाठी पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते. मात्र, पाईप टाकल्यानंतर ठेकेदाराने यावर खडीकरण आणि डांबरीकरण करणे अपेक्षित होते. परंतु, ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अवकाळी पावसामुळे खोदलेले खड्डे उघडे पडले आहेत आणि आतील माती रस्त्यावर आल्याने सर्वत्र चिखल पसरला आहे.
याचबरोबर, बंड्या केरकर यांच्या दुकानासमोरची धोकादायक झाडे त्वरित हटवण्यासंबंधी मुख्याधिकारी पाटील यांनी झाड मालकांना नोटिसा काढण्याचे निर्देश दिले. रस्त्याच्या कडेला असलेले धोकादायक वीज खांब हटवून रस्ता सुरक्षित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या असून, या संदर्भात वीज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्याधिकारी पाटील यांनी बोरजिस वाडा, नक्षत्र अपार्टमेंट, कुणकेरी रस्ता या भागांची पाहणी केली. तसेच, नुकत्याच बांधलेल्या गटाराला भगदाड पडल्यामुळे ते तातडीने दुरुस्त करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित ठेकेदाराला दिले. नागरिकांनी रस्त्याच्या मधोमध खोदलेल्या आणि दुरुस्त न केलेल्या पाणीपुरवठा पाईपलाईनमुळे पडलेल्या मोठ्या खड्ड्यांकडे मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यावर तात्काळ काम सुरू करण्याचे निर्देश त्यांनी अधिकारी आणि संबंधित ठेकेदाराला दिले आहेत.