योग्य वेळी, योग्य जोखीम हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली : युवराज लखमराजे

भोंसले फार्मसी महाविद्यालयात पाचवा पदवीदान समारंभ दिमाखात
Edited by: विनायक गांवस
Published on: April 22, 2024 13:16 PM
views 168  views

सावंतवाडी : यशवंतराव भोंसले फार्मसी महाविद्यालयात पाचवा पदवीदान समारंभ दिमाखात संपन्न झाला. या समारंभात २०१९-२०२३ या तुकडीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांच्या मुंबई विद्यापीठाने दिलेल्या पदव्या समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आल्या. प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य सावंतवाडीचे युवराज श्रीमंत लखमराजे सावंत-भोंसले उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष बीकेसीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोंसले, बीकेसी अध्यक्षा ऍड. सौ. अस्मिता सावंत-भोंसले, सुनेत्रा फाटक, यशवंतराव भोंसले कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. विजय जगताप आदी  मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्राचार्य डॉ. विजय जगताप यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. दीक्षांत समारंभाचे प्रास्ताविक व उद्दिष्टे परीक्षा प्रमुख प्रा.नमिता नार्वेकर, यांनी दिली. समारंभाचे स्वागत संबोधन प्राचार्य डॉ विजय जगताप यांनी केले. त्यानंतर पदवीधरांना दीक्षांत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. भाषणात प्रमुख पाहुणे युवराज श्रीमंत लखमराजे सावंत-भोंसले यांनी पदवीधारकांना मोलाचे मार्गदर्शन केले. ज्यात त्यांनी सांगतले की, आयुष्यात यश हे प्रत्येकालाच हवे असते. परंतु यश मिळवण्यासाठी आपणास त्याचप्रकारची जोखीम पत्करावी लागते. तरच यश मिळते. तसेच प्रत्येकाने पैशापेक्षा माणसाला महत्व देणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त क्षेत्रात कुशल असणे आवश्यक आहे.

प्रत्येकाने नेहमी नवीन गोष्टी शिकायला हव्यात, संकटाना धैर्याने सामोरे जायला हवे. हीच यशाची गुरुकिल्ली आहे असा बहुमोल संदेश त्यांनी दिला. त्यानंतर अध्यक्षीय भाषणात अच्युत सावंत-भोंसले यांनी सुजाण नागरिक म्हणून आपली जबाबदारी कशी पार पाडावी याबाबतचे मार्गदर्शन केले. फार्मासिस्ट शपथीचे पठण डॉ. जगताप यांनी केले. मुंबई विद्यापीठाच्या संकेतानुसार मान्यवरांनी शेला परिधान केला होता. त्यानंतर कार्यक्रमाचे समन्वयक प्रो. मयुरेश रेडकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली. या समारंभाचे सूत्रसंचालन परीक्षा समन्वयक प्रो. प्रणाली जोशी यांनी केले. या समारंभासाठी बीकेसी चे रजिस्ट्रार प्रसाद महाले, यशवंतराव भोंसले इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि चे प्राचार्य डॉ. रमण बाणे, यशवंतराव भोंसले कॉलेज ऑफ डी फार्मसी चे प्राचार्य सत्यजित साठे, यशवंतराव भोंसले पॉलीटेकनिक चे प्राचार्य  गजानन भोंसले आदी उपस्थित होते.दुपारच्या सत्रात पाचवा माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले होते. ज्यात माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून द्वितीय वर्ष फार्मसी च्या मुलांना करिअर बद्दल मार्गदर्शन केले. या मेळाव्याचे सूत्रसंचालन प्रो. डॉ गौरव नाईक यांनी केले.