मॉडेल करिअर सेंटरमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याला योग्य दिशा

सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखमराजे भोसले यांचा विश्वास
Edited by: विनायक गांवस
Published on: March 17, 2023 16:49 PM
views 149  views

सावंतवाडी : करियर आणि वैयक्तिक विकास ही सतत चालणारी एक आजीवन प्रक्रिया आहे. जी योग्यरीत्या लागू केल्यावर आपल्याला आपल्या इच्छित परिणाम आणि यशस्वी करिअर मिळविण्यास सक्षम करते. जीवनात आपल्याला काय प्राप्त करायचे आहे, याच मॅपिंग करून आपल्या स्वतःच्या करिअरच्या प्रगतीची योजना आखणे. आपल्याला कोठे आणि काय मिळवायचे आहे आणि आपल्या उद्दिष्टापर्यंत कसे पोहोचायचे आहे, यासाठी मॉडेल करिअर सेंटरची निश्चित मदत होईल, असा विश्वास सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांनी व्यक्त केला.


सिक्युअर क्रेडेन्शियलच्या मॉडर्न करिअर सेंटर आणि वरेनियम क्लाऊड व ऍडमिशन च्या सहकाऱ्यांनी सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सभागृहात पहिल्यांदाच करिअर कौन्सिलिंग यात्रेचे आयोजन केले. या यात्रेचे उद्घाटन लखमराजे भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमास सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजक शैलेश पै, सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त एडवोकेट शामराव सावंत, डी. टि. देसाई, संस्थेचे सचिव सावंत, व प्राचार्य डॉक्टर दिलीप भारमल उपस्थित होते.


प्रारंभी मॉडेल करिअर सेंटरचे जिल्हा समन्वयक सतीश पाटणकर यांनी सर्वांचे स्वागत करून मॉडेल करिअर सेंटर च्या कार्याविषयी माहिती दिली. यावेळी सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी यांनी शासनाच्या स्पर्धा परीक्षा विषयी माहिती दिली. नागरी सेवा परीक्षा ही इतर सर्व परीक्षांमध्ये प्रमुख आणि काठिण्यपातळीत सर्वाधिक वरची मानली जाते. इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम यूपीएससीच्या जवळपास जाणारा असतो. हा अभ्यासक्रम चांगला झाला की इतर परीक्षेला तुम्ही सहज सामावले जाऊ शकता. यूपीएससीची तयारी करताना सामान्य अध्ययनाचा पायाभूत अभ्यास चांगला झाल्यामुळे इतर परीक्षांना सामोरे जाण्यात विशेष अडचणी येत नाही. आणि नव्याने अभ्यासही करावा लागत नाही. इतर परीक्षांचा अभ्यासक्रम परीक्षा पद्धती पॅटर्न यामध्ये काही अवश्य फरक असतो, पण त्यासाठी तुम्हाला फार आणि मोठे श्रम घ्यावे लागत नाही. यासाठी विद्यार्थ्यांनी यूपीएससीच्या परीक्षेला बसणे गरजेचे आहे, असे श्री रेड्डी म्हणाले. 


यूपीएससीच्या एका परीक्षेच्या अभ्यासामुळे एम.पी.एस.सी स्टाफ सिलेक्शन बँकिंग रेल्वे पोस्ट संरक्षण दल एलआयसी अशा विविध परीक्षेला बसणे सोपे जाते यासाठी थोडा कालावधी जरूर द्यावा लागेल. असे त्यांनी याप्रसंगी सांगितले इंटरनेटच्या माध्यमातून आपणास हवी ती माहिती आणि मार्गदर्शन उपलब्ध होऊ शकते स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात अनेक संकेतस्थळे आणि युट्युब द्वारे खूप माहिती उपलब्ध आहे. वक्तृत्व आणि लेखन शैली सुधारावी कुठल्याही परीक्षेसाठी लेखन शैली उत्तम असायला हवी स्पर्धा परीक्षेसाठी काही पेपर्स हे वर्णनात्मक असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुंदर असायला हवे ते विकसित करता येऊ शकते. लेखन म्हणून वाचन चिंतन आणि मेहनत या पंचसुत्रीतून प्रभावी लेखन कौशल्य सुधारता येते असेही ते म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता आहे. या जिल्ह्यातील मुले अभ्यासात प्रचंड हुशार आहेत विविध परीक्षांमध्ये यश मिळवलेले विद्यार्थी भविष्यात स्पर्धा परीक्षांमध्ये टिकत नाहीत, याची कारणे शोधून त्या दृष्टीने अभ्यास करण्याची गरज आहे, तसेच या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनीही स्वतःच्या भविष्यासाठी स्वतःचे गाव आणि घर सोडण्याची गरज आहे. आज आपल्या अवतीभवती असंख्य परप्रांतीय मुले रोजगारासाठी येत असतात. कोणत्याही प्रकारचे काम करण्याची त्यांची तयारी असते. त्यांच्या या मानसिकतेचा विचार आणि अभ्यास आपल्या विद्यार्थ्यांनी करून आपले करिअर शस्त्र निवडण्याची गरज आहे, असे मत उद्योजक शैलेश पै यांनी यावेळी व्यक्त केले. 


यावेळी पाहुण्यांचा परिचय मॉडर्न करिअर सेंटरच्या कौन्सिलर हर्षा सावंत यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नबिला हेरेकर यांनी केले, शेवटी महायुथचे अतिरिक्त संचालक दयाळ कांगणे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राध्यापक सचिन देशमुख, आफताब बेग, सुमेध जाधव, बघूजी शेळके यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी देशभक्त गव्हाणकर महाविद्यालयाचे प्राध्यापक साईप्रसाद पंडित तसेच जैतापकर ऑटोमोबाईलचे प्रदीप राणे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.