
वैभववाडी : एडगांव येथे ट्रक व रिक्षा यांच्या अपघातात गंभीर जखमी झालेले रिक्षाचालक गणपत काशीराम धावडे (वय ५६) रा. करुळ भोयडेवाडी यांचा उपचारादरम्यान मुंबई येथे आज( ता. ११) मृत्यू झाला.गेले १७ दिवस ते मृत्यूशी झुंज देत होते.अखेर आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.तळेरे गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावरील नुतनीकरणाच्या कामानंतर हा पहीला बळी ठरला.
तळेरे - गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावर एडगांव येथे २६मार्च ला ट्रक व रिक्षा यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला होता. या अपघातात रिक्षा चालक श्री धावडे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर कणकवली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचाराला त्यांची प्रकृती साथ देत नव्हती,म्हणून त्यांना नातेवाईकांनी मुंबई येथील केईएम रुग्णालयात हलवले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. श्री धावडे हे गेली २५ वर्षे वैभववाडी स्टॅन्डला रिक्षा व्यवसाय करीत होते. ते मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त होत आहे. वैभववाडी रिक्षा संघटनेच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, भाऊ, नातू असा परिवार आहे.