दोडामार्ग तहसीलदारांना शोधणाऱ्यांना 51 हजारांचं बक्षीस

बाबुराव धुरींची घोषणा
Edited by: लवू परब
Published on: May 30, 2025 19:17 PM
views 841  views

दोडामार्ग : दोडामार्ग तहसीलदार चार महिन्यांपासून गायब झाले आहेत. त्यांना शोधून आणणाऱ्यास ५१ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे आवाहन ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे, सध्या महाराष्ट्रात शैक्षणिक प्रवेशाची लगबग सुरु आहे. असे असताना दोडामार्ग तहसिलदार मात्र सुशेगाद सुट्टी उपभोगत आहेत. त्यांनी खुशाल फिरावे, मात्र दोडामार्ग तहसिलदार पदातून कार्यमुक्त व्हावे. तालुकावासियांनी तालुक्यातील महसुली गाऱ्हाणी कोणाकडे मांडावीत? असा उद्विग्न सवाल बाबुराव धुरी यांनी उपस्थित केला आहे. 

तालुक्यातील ५८ गावांवर महसुली अंकुश कोणी ठेवावा ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्यात अनेकवेळा दोडामार्गमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होते. अशा आपत्कालीन परिस्थितीत येथील तहसीलदार हे तहसीलदार पदाची पाटी घेवून हिंडत आहेत. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यास शोधून त्याला खुर्चीवर बसवणाऱ्यास ५१ हजारांचे बक्षीस देवू, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.