
वेंगुर्ले : आंबा हे पीक सुमारे १२५ देशामध्ये घेतले जाते. भारताचा या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांक लागतो. हापूस अणि केशर आंब्याला जास्त मागणी आहे. तरी सुद्धा प्रति हेक्टर उत्पादन वाढविण्यासाठी झाडांचे पुनरुज्जीवन करून योग्य मार्गदर्शन सह शेतकर्यांना आपले आर्थिक उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे. आंब्याच्या उत्पादन वाढीसाठी आंब्याच्या पुनरुज्जीवन हा महत्त्वाचं भाग असून कोकण कृषी विद्यापीठाचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ एम.पी. सणस यांनी वजराट येथे आयोजित कृषी दिन कार्यक्रमात केले.
वेंगुर्ला पंचायत समिती, तालुका कृषी विभाग व वजराट ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वजराट ग्रामपंचायत सभागृहात कृषी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अनन्या पुराणिक या होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे एम.पी. सणस, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, तालुका कृषी अधिकारी निरंजन देसाई, मंडळ अधिकारी हर्षा गुंड, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, कृषी अधिकारी सखाराम सावंत, सुप्रिया कोरगावकर, शुभदा कविटकर, वजराट उपसरपंच श्यामसुंदर पेडणेकर, धनंजय गोळम, दीपिका राणे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वजराट ग्रामपंचायत ते वजराट शाळा अशी वृक्षदिंडी काढण्यात आली. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी आयोजित कृषी दिन कार्यक्रमास दिनेश पाटकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व प्रगतशील शेतकरी सुशांत नाईक यांच्या हस्ते डॉ. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले .
भातपिक स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार
या कार्यक्रमात खरीप हंगाम २०२३ भातपिक स्पर्धेत तीन क्रमांक प्राप्त शेतकर्यांना रोख रक्कम शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये अंकुश गोविंद परब (रावदस), स्वप्निल झिलू परब (परबवाडा), जणू गणू मुणनकर (कालवीबंदर) इत्यादींचा समावेश आहे. तसेच या कार्यक्रमात सर्व मान्यवर, सरपंच, उपसरपंच , ग्रा प सदस्य, ग्रामसेवक प्रविण भोई, ग्रामविकास अधिकारी अनिल चव्हाण , कृषी मधील पदाधिकारी, शेतकरी इत्यादींचा रोप देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी तालुका कृषी अधिकारी निरंजन देसाई बोलताना म्हणाले, महाराष्ट्रात आंबा काजूचे उत्पादन घेतले जाते. देवगड ला तोडीस तोड आपला वेंगुर्ल्याचा आंबा आहे. भविष्यात येथे नवीन लागवड झाली पाहिजे. शेतकर्यांना आज विविध आव्हानांचा सामना करावा लागत आहे. कृषी विभाग विविध योजनांचा लाभ घेऊन आपली उन्नती साधा. त्यासाठी कृषी विभागाचे नेहमी सहकार्य राहील.पुनरुज्जीवन मध्ये हेक्टरी २० हजार अनुदान असून एमआरजीएस, सिंधुरत्न योजना, पंतप्रधान अन्न प्रक्रिया उद्योग यासाठी आपल्या क्षेत्रीय स्टाफ चे सहकार्य राहील, असेही ते म्हणाले. सरपंच अनंन्या पुराणिक यांनी महाराष्ट्रात आज कृषी दिन सर्वत्र साजरा होतोय. तालुक्यातून वजराट गावात या कार्यक्रमास शेतकर्यांनी दर्शविलेल्या उपस्थितीबाबत समाधान व्यक्त केले. धनंजय गोळम, कविटकर, यांनी मार्गदर्शन केले व विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभदा कविटकर यांनी केले तर सखाराम सावंत यांनी आभार मानले.