
मालवण : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी भराडी देवीची यात्रा 22 फेब्रुवारी रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर आज आंगणेवाडी येथे तहसीलदार वर्षा झालटे यांनी सर्व विभागाची आढावा बैठक घेतली. भाविकांना सुलभ दर्शनासह भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये. आवश्यक एसटी बस, पोलीस बंदोबस्त, यात्रेपूर्वी मंदिरापर्यंत जाणाऱ्या सर्व रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना तहसीलदार झालटे यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. आंगणेवाडी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज तहसीलदार वर्षा झालटे यांनी आंगणेवाडी येथे सर्व विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी आगणेवाडी ग्रामस्थ मंडळ पदाधिकारी, सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
देवीच्या दर्शनाकरिता जास्तीत जास्त स्वतंत्र रांगाचे नियोजन करावे. अपंग/वृध्द यांच्यासाठी विशेष रांगांचे नियोजन करण्यात यावी. भाविकांसाठी मालवण, कणकवली व मसुरे या बाजूने पुरेशा प्रमाणात वाहने पार्किंग करण्यासाठी आवश्यक तेवढ्या प्रमाणात जागा उपलब्ध करावी. तसेच खाजगी वाहनतळ आणि एसटी बसेस करीता आवश्यक असलेली जागा उपलब्ध करण्यात यावी. भाविकांची कोणतीही गैरसोय होता नये याची दक्षता घेण्यात यावी.
मंदिर परीसरापासून किंती अंतरावर स्टॉल व दुकाने ठेवण्यात येणार आहेत तसेच किती स्टॉल उभारले जाणार आहेत याबाबत ग्रामपंचायतने अहवाल सादर करायचा आहे. स्टॉल धारकांना परवानगी देताना त्यावर नियंत्रण तसेच एकूण उभारण्यात येणारे स्टॉल व दुकाने याची माहीती विद्युत विभागास देणे आवश्यक आहे. त्यानुसार व्यवसायिकांना विद्युत पुरवठा आणि पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
वाहतूक नियंत्रण व नियमनासाठी पोलीस विभागाने यात्रा कालावधीसाठी अधिसूचना काढून प्रचलित वाहतूक मार्गात बदल करणेची कार्यवाही करणेत यावी. वाहने पार्किंग मर्यादा निश्चित करावी. आवश्यक संख्येत पोलीस कर्मचारी व गृहरक्षक यांची नेमणूक करावी. महत्वाच्या ठिकाणी पोलीस चौक्या उभारण्यात याव्यात. तसेच मंदिर प्रवेश व्दारा समोर धातुशोधक (DFMD) बसविण्यात यावे. गर्दीच्या ठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवताना वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे. देवस्थान परिसर, मंदिराचे मार्गाची तपासणी करणेत यावी. बॅरागेटींग चे काम तपासुन त्यानंतर दोन वेळा मॉकड्रील घ्यावे अशी सूचना करण्यात आली आहे.
मंदिर परीसरातील असलेल्या विहीरी, तसेच बोअरवेलची तपासणी करावी व पाण्याच्या उपलब्धते बाबत अहवाल तयार करावा. मंदिर परिसरात असलेल्या तळीचे पाणी पिण्यास योग्य व पाण्याचा साठा पुरेसा असल्याची खात्री करावी तसेच तपासणी करुन अहवाल सादर करावा अशी सूचना करण्यात आली आहे. मंदिर परिसरात आवश्यक त्या सर्व सुविधासह PHC सेंटर ठेवणेत यावे. त्याच प्रमाणे पुरेशा प्रमाणात प्राणवायू, जीवरक्षक औषधे व सुविधा असलेल्या रुग्णवाहिका वैद्यकिय पथकाकडून सुसज्ज ठेवाव्यात अशा सूचना आरोग्य विभागास देण्यात आल्या आहेत. नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचारी यांची माहीती तहसीलदार मालवण यांचेकडे पुरविण्यात यावी. जवळच्या आरोग्य केंद्रात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास वैद्यकीय पथक, अतिरिक्त डॉक्टर, वेड रुग्णवाहिका यांची व्यवस्था करून ठेवण्यात यावे असेही सांगण्यात आले.
भाविकांसाठी पुरेशा प्रमाणात एसटीच्या सुविधा उपलब्ध करुन घ्याव्यात. भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. रेल्वे स्थानकावर कक्ष कार्यान्वीत करण्याबरोबरच रेल्वेच्या वेळापत्रकाप्रमाणे एसटी बसेसची व्यवस्था करावी. तथापी परिवहन विभाग तसेच पोलीस अधिक्षक यांचे सहयोगाने वाहतुकीबाबत नियंत्रण करावे. तसेच सर्व चालक व वाहक यांना त्यांनी भाविकांशी सौजन्याने वागण्याच्या सूचना परिवहन विभागास देण्यात आल्या आहेत.
आंगणेवाडीकडे जाणा-या सर्व रस्त्यांचे काम चालू असून मंदिराकडे जाणारे रस्ते सुस्थितीत असतील याबाबत उपाययोजना करणेत यावी. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर आवश्यक त्या ठिकाणी दिशा दर्शक फलक, रिफ्लेक्टर लावावेत. सा.बा. खात्याकडून रस्त्याची साईडपट्टीचे काम करण्यात यावे तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी साफ करणेत यावी. हॅलीपॅडची सुविधा अधिकची हवी असल्यास तशी कार्यवाही करावी अशा सूचना बांधकाम विभागास करण्यात आली. यात्रा कालावधीत मोबाईल नेटवर्क मिळत नाही त्यामुळे दूरध्वनी व्यवस्था अकार्यक्षम होते. आंगणेवाडी यात्रेपूर्वी बीएसएनएल टॉवरची क्षमता तपासून टॉवरची क्षमता वाढविणेबाबत तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच यात्रा ठिकाणी तात्पुरता फिरता टॉवर बसविण्यात यावा. तसेच यात्रेच्या ठिकाणी वायफाय सुविधा उपलब्ध करण्यात यावी अशी सूचना बीएसएनएल अधिकाऱ्यांना करण्यात आली.
उपहारगृह व खाद्यपदार्थ विक्री केंद्रे अचानक तपासून, भेसळ युक्त अन्न पदार्थ विक्रेत्यांवर कायदेशिर कारवाई करावी. विशेषतः पेढा, खवा विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात यावी. तसेच यात्रेच्या ठिकाणी विषबाधा या सारखा प्रकार होणार नाही यासाठी आवश्यक ती उपाय योजना करावी. तसेच दुकानदार यांना आवश्यक लेखी सूचना संबधित विभागाकडून देण्यात याव्यात अशा सूचना अन्न व औषध प्रशासनास देण्यात आल्या.
उत्पादन शुल्क विभागानेही यात्रा परिसरात व पंचक्रोशीत अवैध दारु उत्पादन, वाहतूक व विक्री होऊ नये, यासाठी आवश्यक वाटल्यास स्थानिक नागरीक व देवस्थान ट्रस्ट यांचेकडून गुप्त माहीती मिळवावी व यात्रा परिसरात व पंचक्रोशीत अवैध दारु उत्पादन, वाहतूक व विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी. यात्रा कालावधीत ५ कि.मी. परिसरातील दारू दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.