
मंडणगड : केंद्र सरकार व राज्य शासनाच्या सूचनेनुसार सुशासन सप्ताह साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निर्देशानुसार मंडणगड तालुक्यात तहसील कार्यालयाच्या माध्यमातून, कार्यालयात 19 डिसेंबर 2024 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत सुशासन सप्ताह साजरा करण्यात आला.
सुशासन सप्ताहात 73 उत्पन्नाचे दाखले, 5 वय व अधिवास दाखले, 2 शेतकरी दाखले, 127 प्रतिज्ञापत्र तसेच 16 आदिवासी कुटुंबीयांना शिधापत्रिका देण्यात आल्या. तलाठी मंडल अधिकारी स्तरावर 96 फेरफार नोंदणी निर्गमित करून 340 सातबारा व 42 8 (अ) खाते उतारे व 155 फेरफार उतारे वितरित करण्यात आले आहेत. या सप्ताहाच्या अनुषंगाने दि. 21 डिसेंबर 2024 या दिवशी तहसील कार्यालयाच्या सर्व कर्मचारी अधिकारी यांनी कार्यालय व परिसराची स्वच्छता केली. 22 डिसेंबर 2024 रोजी उपविभागीय कार्यालय दापोली व तहसील कार्यालय दापोली व मंडणगडच्या वतीने सर्व कर्मचारी, अधिकारी यांना डॉक्टर संजय कुंडेटकर सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी यांनी महसूल विषयक बाबींचे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणाला दापोली, मंडणगड तालुक्यातील 97 कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.
24 डिसेंबर 2024 रोजी ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी ग्राहकांचे हक्क व अधिकार याबाबत रेशन दुकानदारांच्या अडीअडचणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेले ग्राहक रेशन दुकानदार असे 78 नागरिक उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमांमध्ये 12 शिधापत्रिका चे वाटप करण्यात आले.