वाळू तस्करांना 'महसूल' चा दणका | 7 बोटी ताब्यात, एक जाळली !

सावंतवाडी तहसिलदार अरुण उंडे यांच्या नेतृत्वाखाली धाडसी कारवाई
Edited by: प्रतिनिधी
Published on: April 04, 2023 19:34 PM
views 507  views

सावंतवाडी : आरोंदा येथील खाडीपात्रात बेकायदा वाळू उपसा करणार्‍या वाळू तस्करांना मंगळवारी महसुल व पोलिस प्रशासनाने दणका दिला. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या तब्बल सात बोटी ताब्यात घेतल्या तर एक बोट जाळून टाकण्यात आली आहे. कांदळवनात असलेली झोपडीला नष्ट करण्यात आली आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून अन्य काही जण पळून गेले. ही कारवाई सावंतवाडी तहसिलदार अरुण उंडे यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी पोलिसांकडुन करण्यात आली. दरम्यान या नेमक्या बोटी कुणाच्या? याची चौकशी सुरू असून बोटी मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे तहसिलदार उंडे यांनी यावेळी स्पष्ट केले.


आरोंदा येथील खाडीत गोव्यातील काही लोकांकडुन बिनदिक्कत वाळू उपसा केला जात असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार उंडे यांनी सावंतवाडी पोलिसांना मदतीला घेवून त्या ठिकाणी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. यावेळी त्या ठिकाणी आठ बोटी आढळून आल्या. त्यातील एक बोट जाळून टाकण्यात आली असून उर्वरित सात बोट ताब्यात घेण्यात आल्या आहेत. तसेच याप्रकरणी दोघा परप्रांतीय कामगारांना ताब्यात घेण्यात आले आहे. उंडे यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले, गेले अनेक दिवस तक्रारी होत्या. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र संबधितांच्या बोटीत वाळू आढळली नाही तर बाजूला वाळूचा मोठा साठा आढळून आला आहे. तो ताब्यात घेण्यात आला असून ही वाळू नेमकी कोणाची? बोटी कोणाच्या? याची चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे, असे उंडे म्हणाले.

या कारवाईत मंडळ अधिकारी विनायक कोदे, गुरूनाथ गुरव, तलाठी पास्ते,कविटकर, गावडे, खान मुळीक, नागराज गोरे, पाटोळे तसेच पोलिस उपनिरीक्षक आनंद यशवंते आदी सहभागी झाले होते.