विधानसभा निवडणुकीपूर्वीच बंड्या साळवींची माघार

Edited by: मनोज पवार
Published on: October 02, 2024 10:46 AM
views 173  views

रत्नागिरी  : रत्नागिरी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील तिघांपैकी तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी निवडणुकीपूर्वीच माघार घेतली आहे. पक्षासाठी मोठे योगदान असलेले नेते उदय बने आणि राजेंद्र महाडीक यांच्या शब्दाला मान देऊन मी माघार घेत आहे; परंतु पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणून चमत्कार घडवू, अशी प्रतिक्रिया उबाठाचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी दिली.

रत्नागिरी विधानसभा मतदार संघात निवडणुकीआधीच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात लढण्यास इच्छुक असलेल्या उबाठाच्या तिघांपैकी एका उमेदवाराने माघार घेतली आहे. शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर प्रथमच दोन्ही शिवसेना निवडणूक लढणार आहे. त्यामुळे तालुक्यासह राज्यात शिवसेनेच्या मतांचे आणि पदाधिकाऱ्यांचे मोठे विभाजन झाले. या विधानसभा निवडणुकीत कोणाची किती ताकद, ते स्पष्ट होणार आहे.

उदय सामंत यांनी २० वर्षामध्ये हा मतदार संघ मजबूत बांधला आहे; परंतु राजकीय परिस्थिती त्यांना अनुकूल दिसत नाही. भाजपशी अजूनही ते एकरूप झालेले नाहीत. महायुती असली तरी लोकसभेचा वचपा म्हणून राणे कुटुंबाकडून त्यांना अडचणीत आणण्याचा डाव असणार आहे. या राजकीय परिस्थितीनंतर आता उबाठामध्येही इच्छुकांची गर्दी आहे. २८ सप्टेंबरला मातोश्रीवर झालेल्या रत्नागिरी तालुक्याच्या बैठकीत अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. त्यातूनच प्रदीप साळवी यांनी निवडणुकीतून माघार  घेतल्याचे स्पष्ट केले आहे.