
सावंतवाडी : येथील श्री पंचम खेमराज विद्यालयात भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांमधील कला, विचारशक्ती, देशभक्ती आणि सर्जनशीलतेला वाव देण्याचा उद्देश आयोजकांनी व्यक्त केला आहे. ही स्पर्धा उद्या २३ डिसेंबर रोजी ६ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी खुल्या असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्थाध्यक्ष दयानंद कुबल यांनी केले आहे.
या उपक्रमांतर्गत सहा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रथम चित्रकला स्पर्धा असून A-3 साइज वॉटर कलरमध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा जीवनप्रवास रेखाटून पाठवायचा आहे. दुसरी निबंध लेखन स्पर्धा असून ३०० शब्दांत अटल बिहारी वाजपेयी यांचे समाजासाठी व देशासाठी असलेले योगदान मांडायचे आहे. तिसरी वेशभूषा (फॅन्सी ड्रेस) स्पर्धा स्टेजवर होणार असून भारतासाठी योगदान देणाऱ्या थोर व्यक्तिमत्त्वांच्या भूमिका साकारल्या जाणार आहेत. याशिवाय पोस्टर मेकिंग स्पर्धा A-5 साइजमध्ये असून देशासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रेरणादायी घोषवाक्यांवर आधारित स्लोगन तयार करायचा आहे. सांस्कृतिक सादरीकरण अंतर्गत ३ ते ५ विद्यार्थ्यांच्या गटाने नृत्य सादर करायचे आहे. तसेच वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांना अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यावर ३ मिनिटांचे भाषण सादर करायचे आहे. ही स्पर्धा सकाळी १० वाजता सुरू होणार असून सावंतवाडी नगराध्यक्ष युवराणी श्रीमती श्रद्धा लखम भोसले प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, नेतृत्वगुण आणि सर्जनशीलतेचा विकास होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.












