
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील मळगावचे सुपुत्र आणि दशावतार नाट्यकलेतील अभ्यासू, संवेदनशील व्यक्तिमत्त्व नितीन आसयेकर यांना ठाणे येथील 'कोकण आधार प्रतिष्ठापन' तर्फे मानाचा “कोकण गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत कार्यरत असलेल्या या सामाजिक व शैक्षणिक संस्थेने आसयेकर यांच्या सांस्कृतिक योगदानाची दखल घेतल्याने संपूर्ण कोकणातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लोककलेचा निष्ठावंत वारसदार नितीन आसयेकर हे केवळ एक उत्कृष्ट कलाकार नसून दशावतार या प्राचीन लोककलेचे निष्ठावंत सेवक आणि संवर्धक आहेत. 'भूमिका दशावतार नाट्य मंडळा'चे मालक म्हणून त्यांनी या नाट्यपरंपरेला आधुनिकतेची जोड देतानाच तिचा मूळ आत्मा जपण्याचे मोलाचे कार्य केले आहे. अभिनय, दिग्दर्शन, प्रभावी संवादफेक आणि नेटकी रंगभूषा यांत त्यांचा हातखंडा असून, नव्या पिढीला या कलेचे धडे देण्याचे कार्यही ते सातत्याने करत आहेत. आसयेकर यांचा ग्रामीण भागातून सुरू झालेला प्रवास आणि त्यांनी सांस्कृतिक स्तरावर उमटवलेला आपला ठसा हा कष्ट, शिस्त आणि अभ्यासाचे उत्तम उदाहरण आहे. त्यांना मिळालेला हा सन्मान म्हणजे केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून संपूर्ण दशावतार परंपरेचा गौरव असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.












