
सावंतवाडी : आंबेगाव येथील शेतकरी जानू फाले यांच्या कुटुंबीयांची सिंधुदुर्ग जिल्हा पशूधन व कृषी विकास संस्थेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगांवकर यांची भेट घेत श्री. फाले यांना उपचारासाठी मदत केली. तसेच कुटूंबाला धीर दिला. यावेळी श्री. प्रभूगांवकर यांनी मारहाणकर्त्यांवर गुन्हे दाखल न झाल्यास शेतकरी कायदा हाती घेतील असा इशारा दिला.
आंबेगाव येथे जात त्यांनी श्री. फाले यांना आर्थिक मदत केली. तसेच आंबोली येथे घडलेल्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. यावेळी श्री. प्रभूगांवकर म्हणाले,
शेतकरी फाले कुटुंब दुसऱ्यांच्या जमीनी घेऊन कसतात. अशावेळी त्यांच्यासह झालेला प्रकार दुर्दैवी आहे. जनावर पाळण त्यांना शक्य नसाताना नातेवाईकांकडे ते नेत असताना त्यांना मारहाण झाली. त्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न श्री. फालेनी केला. मारहाणकर्ते उजळ माथ्याने फिरत आहेत. मात्र, या कुटुंबाच्या पाठीशी शेतकरी संघटना आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल न झाल्यास कायदा हातात घेऊ असा इशारा त्यांनी दिला. तर आंबेगाव सरपंच शिवाजी परब म्हणाले, आज ज्ञानू फाले हे अंथरूणाला खिळून बसलेत. त्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही निंदनीय घटना आहे. बैल पोसण्याची त्यांची परिस्थिती नव्हती म्हणून ते नातेवाईकांकडे घेऊन जात होते. त्यांना झालेल्या मारहाणीनंतर कुणी शेतकऱ्याची विचारपूस केली नाही. आज शेतकरी संघटना आली त्याबद्दल आभार मानतो. तसेच संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी संग्राम प्रभूगांवकर, रूपेश पावसकर आदींसह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, आंबेगाव ग्रामस्थ व फाले कुटुंब उपस्थित होते.












