
सावंतवाडी : पर्यटन हा माझा अतिशय आवडता विषय असून आपण या राजघराण्याची सून म्हणून आल्या आल्या संस्थानची ऐतिहासिक परंपरा असलेल्या या राजवाड्यात हेरिटेज हाॅटेल सुरू केले. ज्यामुळे शेकडो देशी व परदेशी पर्यटकांचे पाय सावंतवाडी सारख्या सुंदर शहराकडे वळले. यातून काही स्थानिक लोकांना रोजगार देवू शकलो याचे राजघराण्याला समाधान असून पर्यटनासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असा विश्वास सावंतवाडीच्या नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी व्यक्त केला.
त्या म्हणाल्या, भविष्यात सावंतवाडी शहराचा सावंतवाडीतील सर्व पर्यटन व्यावसायिकांना आणि नागरिकांना विश्वासात घेऊन आणि त्यांचे मार्गदर्शन घेऊन विकास आराखडा तयार केला जाईल, जेणेकरून सावंतवाडी शहर हे ग्लोबली कसे अधोरेखित होईल असा माझा प्रयत्न असेल असे प्रतिपादन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्या पर्यटन महासंघाचे जिल्हा कार्यवाह ॲड. नकुल पार्सेकर व सावंतवाडी तालुकाध्यक्ष जितेंद्र पंडित यानी आज त्यांची अभिनंदन करण्यासाठी सदिच्छा भेट घेतली त्यावेळी त्यांनी आश्वासित केले.












