
सिंधुदुर्गनगरी : सेवानिवृत्ती नंतरची पेन्शन विक्री, गॅच्युईटी व ७ वा वेतन आयोग हप्ता व वैद्यकिय प्रतिपूर्ती बिलांची रक्कम न मिळाल्यामुळे सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अधिकारी संघटना आक्रमक झाली आहे. आमचे प्रश्न न सुटल्यास जिल्हाधिकारी भवनासमोर उपोषण करू असा इशारा या संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद नारकर यांनी दिला आहे.
गेल्या वर्षापासून सेवानिवृत्तीनंतरची जि.प. प्राथ. शिक्षक, माध्यमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी,शासकीय-निमशासकीय कर्मचारी व अधिकारी, यांची पेन्शन विक्री, गॅच्युईटी व ७ वा वेतन आयोग हप्ते, वैद्यकिय प्रतिपूर्ती बिले व इतर बिलांची रक्कम थकीत आहे. ती मिळणेसाठी निवेदन सादर करीत आहे. ती न मिळाल्यास प्रत्येक जिल्हाधिकारी यांचेसमोर आमरण उपोषण करु असा इशारा या संघटनेने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. वाशिम, अमरावती या जिल्ह्यांच्या रकमा मिळालेल्या आहेत. राहीलेल्या सर्व जिल्ह्यांच्या रकमा मिळाव्यात याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेत या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत त्यांचे लक्ष वेधले. या संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद नारकर, कार्याध्यक्ष प्रकाश कोचरेकर जिल्हा सरचिटणीस नितीन जठार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर केले. राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री यांचे या निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले आहेत.