श्री देवी भगवती मंदीराचा जिर्णोद्धार, कलशारोहण व मुर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा

सांगुळवाडीत ९ ते ११ मे रोजी विविध कार्यक्रम
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 03, 2023 09:24 AM
views 302  views

वैभववाडी : सांगुळवाडी गावचे ग्रामदैवत श्री भगवती देवी मंदिराचा जीर्णोद्धार, कलशारोहण व मुर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा दि ९, १०, ११ मे रोजी संपन्न होणार आहे. या मंदीराचा कलशारोहण सांगुळवाडी दत्त दरबाराचे प.पू.स्वामी विठ्ठल राणे महाराज यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मंदिर जीर्णोध्दार सोहळ्याला मंगळवार दि ९ मे रोजी प्रारंभ होणार आहे. या दिवशी जलयात्रा, देवतांना आवाहन, महागणपती पुजन, अग्नी स्थापना, मुर्तीची शुद्धी, वास्तू होम, महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. दुस-या दिवशी दि ९ मे रोजी स्थलशुद्धी, स्थापित देवतांचे पूजन, मुख्य देवता हवन, जलधारा, महाआरती व प्रार्थना, महाप्रसाद हे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.तसेच गुरुवार दि ११ मे रोजी सकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत प.पू .स्वामी विठ्ठल राणे महाराज यांच्या हस्ते कलशारोहण सोहळा संपन्न होणार आहे.


याच दिवशी स्थलशुद्धी, मुर्तीची मिरवणूक, प्रवेश व प्राणप्रतिष्ठापना,अभिषेक, महाआरती, महाप्रसाद,पालखी मिरवणूक आदी कार्यक्रम होणार आहेत. तसेच या तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहील्या दिवशी महीलांकरिता होम मिनिस्टर, ओंकार प्रासादिक भजन मंडळ फोंडाघाट यांचं सुस्वर भजन, अजित गोसावी यांचे भजन, आंडरआर्म क्रिकेट स्पर्धा, दुसऱ्या दिवशीही होम मिनिस्टर कार्यक्रमाचा पुढील टप्पा,बुवा अमेय आर्डेकर, बुवा योगेश पांचाळ यांचं सुस्वर भजन व स्थानिक भजने इत्यादी कार्यक्रम होणार आहेत.


तिस-या दिवशी मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यामध्ये आ.नितेश राणे, आमदार राहुल पाटील, उद्योजक भालचंद्र केशवराव रावराणे, उद्योजक भास्कर विचारे,महाराणा शिक्षण संस्थेचे संचालक अरविंद रावराणे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. यानंतर रात्री हभप सुप्रीयाताई साठे यांचे किर्तन होणार आहे. या तीन दिवसीय सोहळ्यानिमित्त दोन्ही वेळेला महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असं आवाहन श्री भगवती देवी देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती सांगुळवाडी यांनी केले आहे.